शिकारी खुद शिकार हो गया.. काळवीट, हरणांची शिकार भोवली

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । वैजापूर वनविभागाने आज बोरअजंटी-वैजापूर रस्त्यावर, राखीव वनकक्ष क्र.२३६ च्या हद्दीत केलेल्या संयुक्त गस्ती व नाकाबंदीदरम्यान वन्यजीव शिकार प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन हरणाच्या शिंगांसह अंदाजे २ किलो शिजवलेले मांस (मटन), एक मोटारसायकल क्र.एमपी.१०.एनसी.४८५७ आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
वनविभागाच्या पथकाने दुचाकी क्रमांक एमपी.१०.एनसी.४८५७ येताना दिसल्यानंतर संशयित व्यक्ती आणि मोटारसायकलची तपासणी केली असता, एका पिवळ्या गोणीत ही सामग्री आढळून आली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे वांगऱ्या पुसल्या बारेला (वय ४८, रा. टाक्यापाणी, ता. वरला, जि. बडवाणी, ह.मु. बोरखेडा, ता. धरणगाव) आणि धुरसिंग वलका बारेला (वय ४५, रा. आत्मज बधुरिया-७, ग्राम वरुड, जि. खरगोन, ह.मु. पळासखेडा) अशी आहेत. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ९ व ५१ अन्वये वनगुन्हा (प्र.रि.क्र ०३/२०२५) नोंदविण्यात आला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी विकेश ठाकरे यांनी स्पष्ट केले की, वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासातून पळवून लावणे, शिकारीसाठी फासकी/वाघूर लावणे किंवा त्यांची शिकार करणे ही कृत्ये वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ९ चे उल्लंघन आहे. अशा उल्लंघनासाठी जास्तीत जास्त ७ वर्षांचा कारावास आणि रु. २५ हजार पर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. हा गुन्हा अजामीनपात्र आणि दखलपात्र स्वरूपाचा असून, वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले.
ही कारवाई धुळे वनवृत्त, धुळे येथील म. वनसंरक्षक (प्रा.) निनू सोमराज मॅडम, उप वनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगाव जमीर शेख, विभागीय वनअधिकारी (दक्षता) धुळे राजेंद्र सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा समाधान पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर विकेश ठाकरे, पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा अनिल भवारी, वनपाल बोरअजंटी सारिका कदम, वनपाल खाऱ्यापाडाव खलील शेख, वनरक्षक श्री. भारसिंग बारेला, योगेश सोनवणे, बानु बारेला, संदीप ठाकरे, वनसेवक दशरथ कोळी, सुशील कोळी, दिनेश कोळी, रामदास अहिरे व निवृत्ती पाटील तसेच पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वी केली.