Detection Story : रात्रीस चाले खेळ, शेताची बत्ती गुल.. गावात आली स्विफ्ट कार, पोलिसांनी मिळाली तपासाची तार
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, ४७ गुन्हे केले उघड, शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । रावेर, फैजपुर, यावल या परिसरात शेतातील इलेक्ट्रीक पोलवरील विद्युत तार चोरीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले होते. सर्वत्र ओरड होत होती त्यात गुन्हेगार हाती लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. अखेर अथक प्रयत्नांनी जळगाव एलसीबीला तपासाचा धागा गवसला. गावात एकाकडे स्विफ्ट कार आली आणि तिथेच संशयाची पाल चुकचुकली. पोलिसांनी बारीक नजर ठेवत रात्रीस चालणारा खेळ उजेडात आणला. एक टोळी गजाआड करीत पथकाने तब्बल ४७ गुन्हे उघड आणले आहेत.
रावेर, फैजपुर, यावल या भागात शेती मधील इलेक्ट्रीक पोलवरील विद्युत तार चोरीचे प्रमाण वाढले असून चोरट्यांनी शेतकऱ्यांना हैराण करून सोडले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाळेच्या पथकास गोपनीय माहिती काढून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपूर्ण परिसर फिरून सर्व घटनांचा बारकाईने अभ्यास केला. तांत्रिक बाबी तपासल्या तरी पोलिसांना तपासाचा धागा गवसत नसल्याने त्यांनी गुप्त माहिती काढण्यास सुरुवात केली.
पथकाला गवसला तपासाचा धागा
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करीत असतांना त्यांना काही सालदार संशयास्पद वाटले. त्यात काही मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याने पथक त्यांच्यावर देखील लक्ष ठेवून होते. नुरा मोरे रा.झिरपांझऱ्या ता.धुलकोट जि.बऱ्हाणपुर याने नुकतेच स्विफ्ट डिझायर चारचाकी घेतल्याची पथकाला माहिती मिळाली. एरव्ही परिसरात आणि समाजात प्रवासी कार, जीप घेण्याचा कल असताना अचानक महागडी कार आल्याने पोलिसांनी तोच धागा पकडत तपासाला सुरुवात केली.
मध्यप्रदेशातून घेतले ताब्यात
मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर जिल्ह्यातील नुरा मोरे व अनिल भेरसिंग मंडले व त्याचे साथीदार हे चारचाकी कारमध्ये येवून चोरी करीत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने व तांत्रिक विश्लेषण करून नुरा मोरे हा त्याचे घरी झिरपांझऱ्या ता.धुलकोट जि.बऱ्हाणपुर येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने वर नमुद स्थागुशा पथक झिरपांझऱ्या येथे जावून नुरा मोरे यास ताब्यात घेतले.
मुसक्या आवळताच दिली गुन्ह्याची कबुली
नुरा यास रावेर, सावदा, फैजपुर, यावल भागातील विद्युत इलेक्ट्रीक पोल वरील तार चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने त्याचे कडील वाहन मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर क्रमांक एमपी.६८झेडसी.२५४६ या गाडीने जावून माझा शालक अनिल भेरसिंग मंडले, संजु चमार वास्कले, रा.परचुडया म.प्र., दिना मोरे, सावन उर्फ पंडु मोरे, दोघ रा.निलीखाडी म.प्र., अश्यांनी मिळून केले असल्याचे सांगीतले. त्यावरून स्थागुशा पथकाने नुरा केरसिंग मोरे व त्याच्या मालकीची गाडी ताब्यात घेवून रावेर पो.स्टे. येथे आणले.
रावेर शहरात विकला माल
पोलिसांनी नुरा मोरे याचा साथीदार अनिल भेरसिंग मंडले, वय २६, रा.तितराण्या ता.धुलकोट जि.बऱ्हाणपुर म.प्र. यास ताब्यात घेवून त्यानंतर नुरा केरसिंग मोरे यास चोरी केलेला मालाबाबत विचारपुस केली असता त्याने रावेर शहरातील भंगार वाला यासीन हुसेन खान यास सर्व माल विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने देखील नुरा केरसिंग मोरे याचेकडून विद्युत तारा विकत घेतल्याची कबुली दिली.
सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पथकाने नुरा केरसिंग मोरे याचेकडून २ लाखांची कार तसेच आरोपी यासीन खान हुसेन खान याचेकडून ३ लाख ५२ हजार ६४२ रुपये किमतीचा २९८०३ मीटर अॅल्युमिनीयमचा इलेक्ट्रीक तार जप्त केला आहे. पोलीस कारवाईमध्ये रावेर पो.स्टे.चे २३ गुन्हे, यावल पो.स्टे.चे १५ गुन्हे, निंभोरा पो.स्टे.चे ४,फैजपुर पो.स्टे.चे ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार महेश महाजन, नितीन बावीस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, ईश्वर पाटील, बबन पाटील, प्रदिप सपकाळे, प्रमोद ठाकुर यांच्या पथकाने पार पाडली आहे.
सालदारच होता म्होरक्या, रात्रीस चाले खेळ
पोलिसांनी पकडलेल्या संशयीत आरोपीतील नुरा हा यावल-रावेर परिसरात सालदार म्हणून काम पाहत होता. तालुक्यात येण्याचा मार्ग त्याचा नित्याचाच असल्याने कुणालाही त्याच्यावर संशय येत नव्हता. तो तालुक्यात येताच इतर साथीदार मोबाईल बंद करुन त्याच्या कारने चोरीसाठी निघत होते. शेतात डीपीची बत्ती गुल करताच हातात येईल तेवढी तार वळायची, तिचे लहान बंडल करुन कारमध्ये टाकून पळ काढायचा असा त्यांचा फंडा होता.