Detection Story : पत्नीच्या बाळंतपणासाठी आला आणि सोनसाखळ्यांवर डल्ला मारून गेला!
जळगाव एलसीबीने आंतरराज्यीय गुन्हेगाराला पकडले : २ गुन्ह्यांची उकल

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. जळगाव शहरात पत्नीच्या बाळंतपणासाठी आलेला असताना शहरात सोनसाखळी चोरून त्याने गावी पळ काढला होता. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी १५ दिवस सापळा रचत त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
जळगाव शहरात गेल्या काही महिन्यात ३-४ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. शहरात वाढत्या घटनेच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी टीम एलसीबीला सूचना केल्या होत्या. एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाने प्रत्येक घटनेची माहिती घेत तपासाला सुरुवात केली होती. सर्व तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय माहितीच्या आधारे माधव श्रावण बोराडे रा.इंदोर याचे नाव निष्पन्न केले.
पत्नीच्या बाळंतपणासाठी आला होता जळगावात
माधव बोराडे हा मूळ मध्यप्रदेशातील रहिवासी असून त्याने तिकडे अनेक गुन्हे केले आहेत. एमपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील तो अट्टल चोरटा असून सोनसाखळी लंपास करणे आणि सोन्याचे पाणी करून ते विक्री करण्यात देखील माहिर असल्याचे समजते. माधव याची पत्नी बाळंतपणासाठी जळगावात आलेली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तो देखील तिच्यासोबत होता. फावल्या वेळेत शहरात फिरून त्याने सोनसाखळ्या लंपास केल्या होत्या.
पोलीस इंदौर पोहचताच काढला पळ
जळगाव एलसीबीच्या पथकाने सलग १५ दिवस माधव याचा शोध घेतला. तो इंदौर येथे गेला असल्याची माहिती पथकाला मिळाल्याने त्यांनी तिथे धाव घेतली. पथकाने माधवच्या घराकडे सापळा लावला असता त्याने तिथून पळ काढला आणि जळगाव गाठले.
जळगावात आवळल्या मुसक्या
इंदौरहून माधव हा जळगावात आल्याची माहिती मिळताच एलसीबीची दुसरी टीम सकाळपासून त्याच्या मागावर होती. अखेर ३-४ तास चोर-पोलीसचा खेळ चालल्यावर पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांना त्याने २ सोनसाखळी चोरीची कबुली दिली असून २ सोनसाखळ्या काढून दिल्या आहेत.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार संजय हिवरकर, विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, राजेश मेढे, पोलीस हवालदार विजय पाटील, हरीलाल पाटील, अक्रम शेख, सर्व नेम. स्थागुशा जळगाव अशांनी केली आहे.