Detection Story : दुकानाच्या पिशवीवरून गवसला तपासाचा धागा, दोन घरफोड्या केल्या उघड
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | जळगाव शहरात आठ दिवसापूर्वी एकाच रात्री तीन दुकाने फोडण्यात आली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले मात्र सर्वांनी चेहऱ्याला पूर्ण रुमाल गुंडाळलेला असल्याने काहीच पुरावा नव्हता. कपड्यांच्या दुकानातून कपडे आणि रोकड तिघांनी लांबवली. कोणताही सबळ पुरावा नसताना शहर पोलिसांना पिंप्राळा हुडको परिसराच्या मागील बाजूला कपड्याच्या दुकानाच्या नवीन कोऱ्या पिशव्या आणि काही अल्पवयीन मुलांच्या अंगावर नवीन कपडे दिसले. पोलिसांनी पिशवीचा धागा गवसत तपास सुरु केला आणि जळगाव, मालेगावची चोरी उघड झाली.
शहर पोलीस ठाण्यासमोरील फुले मार्केटमध्ये गेल्या आठवड्यात दि.४ जून रोजी मैत्री कलेक्शन या कपड्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वायर कापून कपड्यांसह १४ हजारांची रोकड लांबवून नेली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात होता. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले मात्र त्यांनी तोंड बांधलेले असल्याने काहीही ठोस पुरावा नसल्याने पोलीस देखील विचारात पडले होते.
दुकानाच्या कापडी बॅगवरून लागला शोध
कपड्यांच्या दुकानातून कपडे आणि रोकड लंपास झाल्याची बाब पोलिसांनी खबऱ्यांना दिली होती. शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात एका ठिकाणी कपड्याच्या दुकानाच्या कोऱ्या पिशव्या पडल्या असून एका अल्पवयीन मुलाने नवीन कपडे परिधान केले असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी तेजस मराठे यांना मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना याविषयी माहिती दिल्यानंतर त्यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांचे पथक रवाना केले.
दोघांना घेतले ताब्यात तिसरा फरार
शहर पोलीस ठाण्यातील पथकाने तीन दुकाने फोडून चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने तांबापुरा परिसरात राहणाऱ्या साथीदारासह अन्य दोन जणांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर तांबापुरा परिसरातून दुसऱ्या अल्पवयीन मुलाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांवर यापूर्वी देखील जिल्हापेठ आणि रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
मालेगावात फोडले दुकान, साडेसहा किलो चांदीचे दागिने हस्तगत
पोलिसांनी दोघे अल्पवयीन चोरट्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी मालेगावातील किल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराफाच्या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. मालेगाव येथील एकाच्या मदतीने चौघांनी बारा लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरुन नेले होते. शहर पोलिसांनी तो गुन्हा उघड केला असून त्या अल्पवयीन चोरट्यांनी त्यातील साडेसहा किलो चांदीचे दागिने काढून दिले असून पोलिसांनी ते जप्त केले आहे.
पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्र्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सुनिल पाटील, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, तेजस मराठे, योगेश पाटील, सुधीर साळवे, अमोल ठाकूर, मनोज पाटील, रतन गिते यांच्या पथकाने केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पथकाला बक्षीस देखील दिले.