Education

जळगावात उद्यापासून रंगणार देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल!

महा पोलीस न्यूज । दि.७ फेब्रुवारी २०२५ । अजिंठा फिल्म सोसायटी देवगिरी चित्र साधना द्वारा आयोजित चौथा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल दिनांक ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी जळगावात छत्रपती संभाजीराजे नाट्य गृह येथे संपन्न होत आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उत्साह शिगेला पोहोचला आहे. चित्रपट विषयक प्रदर्शनी, शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग, मास्टर क्लास, चर्चासत्र, ओपन फोरम, टुरिंग टॉकीज तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांसह उद्घाटन व समापन सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव रंगणार असल्याची माहिती आयोजकांतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेस अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जयंत शेवतेकर, उपाध्यक्ष अनिल भोळे, सचिव विनीत जोशी, कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, सहसचिव सुचित्रा लोंढे, आयोजन समितीचे प्रमुख डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, पंकज सोनवणे, अमित माळी, चित्रसाधना प्रांत संयोजक किरण सोहळे आदी उपस्थित होते. यंदा या महोत्सवाचे ४थे वर्ष असून खान्देश व मराठवाडा क्षेत्रासह संपूर्ण राज्यातून या महोत्सवासाठी १०० हून अधिक शॉर्टफिल्म सहभागी झाल्या आहेत. तज्ञ परिक्षकांमार्फत परिक्षण करुन यातील निवडक ७२ शॉर्ट फिल्मचे अधिकृत प्रदर्शन या दोन दिवसीय महोत्सवात करण्यात येणार आहे.

परिसराला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्र नगरी नाव
जळगावकर नागरिकांना विविध विषयांवरील गुणवत्तापूर्ण लघुपट, माहितीपटांची मेजवानी मिळणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील अनेक गणमान्य कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक युवा कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवस उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण परिसराला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्र नगरी असे नाव देण्यात आले आहे तर स्क्रिनींग सभागृहांना पद्मविभूषण झाकिर हुसेन व अभिनेता अतुल परचुरे यांचे नाव देण्यात आले आहे.

जुन्या आठवणींना उजाळा देणारा श्री ४२० पाहता येणार
महोत्सवाची ओपनिंग फिल्म ठाकरगांव दि.८ रोजी स ९ वा. उस्ताद झाकिर हुसेन सभागृहात प्रदर्शित करण्यात येईल. या नंतर महोत्सवात सहभागी निवडक ७२ चित्रपटांचे प्रदर्शन दोन दिवसांत दोन्ही कक्षात करण्यात येणार आहे. दुपार सत्रात १२ ते १ या वेळात चित्रपट निर्मिती करणाऱ्यांसाठी माहिती पट निर्मिती प्रक्रिया या विषयावर मुंबई येथील लेखक, दिग्दर्शक व चित्रपट अभ्यासक श्री. अरुण शेखर यांचा मास्टर क्लास होणार आहे. तर तरुणांसाठी अभिनय क्षेत्रातील संधी या विषयावर सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता, पटकथा लेखक गिरीश कुलकर्णी, पुणे यांचा मास्टर क्लास दु. ३ वा. होईल. स्व. राज कपूर मुख्य सभागृहात सायंकाळी ५ वा. अभिनेते गिरीश कुलकर्णी, उद्योजक अशोक जैन, आमदार राजुमामा भोळे, देवगिरी प्रांत सहकार्यवाह स्वानंद झारे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नन्नवरे इ. मान्यवरांच्या उपस्थितीत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमासह भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होईल. शो मॅन स्व. राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष कार्यक्रम यावेळी सादर करण्यात येईल. यावेळी अभिनेता गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक नितिन भास्कर यांना अत्यंत मानाचा यावर्षींचा देवगिरी चित्र गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वा. दुरींग टाकीज या सत्रात भारतीय चित्रपटांचा सुवर्ण काळ दर्शवणारा व जुन्या आठवणींना उजाळा देणारा श्री ४२० हा चित्रपट एम्फी थिएटर, भाऊंचे उद्यान येथे प्रदर्शित करण्यात येईल. तसेच चित्रपट रसिकांशी खुला संवाद कार्यक्रम होणार आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
दि.९ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दोन्ही सभागृहात फिल्म स्क्रिनींग होईल. स. ११ वा. चित्रपट रसग्रहण या विषयावर दिग्दर्शक मिलिंद लेले पुणे यांचा मास्टर क्लास होईल. एम.जी.एम. विद्यापीठ फिल्म मेकिंग विभागाचे प्रमुख प्रा.शिवदर्शन कदम ग्रामीण भागातील युवकांना चित्रपटातील संधी व प्रशिक्षण या विषयांवर युवा फिल्म मेकर्स साठी मास्टर क्लास होईल. तथा दुपार सत्रात होणाऱ्या ओपन फोरम सत्रात ‘योफिमा’ शिष्यवृत्ती विजेते युवा चित्रकर्मी सह सुप्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कराडे युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या संध्याकाळी ५ वा. महोत्सवाचे समापन सत्र होणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे, दिग्दर्शक भाऊराव कराडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.भरत अमळकर, उद्योजक प्रकाश चौबे, ॲड.किशोर पाटील, जनता बँकेचे अध्यक्ष सतिश मदाने उपस्थित राहणार आहे. या प्रसंगी भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे.

विविध समित्यांची स्थापना, जनतेने लाभ घ्यावा
सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म, कॅम्पस फिल्म, माहितीपट यांना सामुहिक तसेच वैयक्तिक पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. हा संपूर्ण महोत्सव सर्व नागरिक, रसिक श्रोते तथा चित्रपट क्षेत्रात करियर करु इच्छित .. तरुणांसाठी पुर्णपणे मोफत असणार आहे. या दोन दिवसीय महोत्सवाचा जळगावकर नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जयंत शेवतेकर, उपाध्यक्ष अनिल भोळे, सचिव विनीत जोशी, कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, सहसचिव सुचित्रा लोंढे, आयोजन समितीचे प्रमुख डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, पंकज सोनवणे तथा चित्रसाधना प्रांत संयोजक किरण सोहळे यांनी केले आहे

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button