धुळ्यात अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश; दोघे अटकेत
६.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

धुळ्यात अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश; दोघे अटकेत
६.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
धुळे: चारचाकी वाहनातून अवैधरीत्या देशी-विदेशी दारू आणि बियरची वाहतूक करत असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिसांनी चारचाकी वाहनासह तब्बल ६ लाख ३३ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मालेगावहून नवापूरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी मालेगाव-धुळे महामार्गावर सापळा रचला आणि संशयित वाहन (DN-09 J-2594) थांबवून तपासणी केली. वाहनातील मगन भाई पटेल (३१) आणि प्रतीक धीरूभाई पटेल (३०, दोघे रा. माटी वाकड, दमन) यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.
वाहनातून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त
गाडीची झडती घेतल्यावर देशी-विदेशी दारू व बियरच्या बाटल्या सापडल्या. यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. संपूर्ण मुद्देमालाची किंमत ६.३३ लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदीसिंग चव्हाण, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, सुनील पाटील, महेंद्र सपकाळ, अतुल निकम यांच्या पथकाने केली.
या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करांचे मोठे जाळे उघडकीस आले असून, पुढील तपास सुरू आहे.