CrimeSpecial

गुन्हेगारी, अवैध धंदे वाढले : जामनेर पोलीस निरीक्षकांना अभय कुणाचे?

गुन्हेगारीमुळे कारभारावर प्रश्नचिन्ह; मंत्री गिरीश महाजनांच्या आश्रयामुळे कारवाई टाळली जात असल्याची चर्चा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांत घडलेल्या गंभीर घटनांनी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. विशेषतः ऑगस्ट २०२५ मध्ये घडलेले मॉब लिंचिंग प्रकरण आणि गॅस सिलेंडरस्फोटाच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. गुन्हेगारी आणि पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेले अवैध धंदे हे सर्व उघड असतानाही निरीक्षक मुरलीधर कासार यांच्यावर कार्यवाही का केली जात नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुरलीधर कासार यांची जुलै २०२४ मध्ये जामनेर पोलीस ठाण्यात नेमणूक झाली. तत्पूर्वी जून २०२४ मध्ये जामनेर पोलीस ठाण्यावर जमावाने दगडफेक केली होती, ज्यात अनेक पोलिस जखमी झाले. या घटनेनंतरही कासार यांच्या नेतृत्वाखालील पोलिस यंत्रणेने कायद्याची कठोर अंमलबजावणी केली नसल्याचे दिसून येते. एका उद्योजकावर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणातही पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले. काही महिन्यांपूर्वी पोलिस ठाण्यासमोरच भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. स्थानिक नागरिकांच्या मते, अशा घटनांमुळे जामनेर भागात गुन्हेगारी वाढली असून, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे सामान्य माणूस असुरक्षित झाला आहे.

मॉब लिंचिगप्रकरणामुळे जिल्हा बदनाम
जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे एका अल्पसंख्याक युवकाच्या हत्येने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग असल्याच्या आरोपांमुळे राजकीय वादळ निर्माण झाले होते. तसेच योग्य तपास न केल्याचा ठपका पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्यावर ठेवत विविध संघटना आणि राजकीय नेत्यांनी टीका केली होती. या घटनेत पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असली तरी, मुख्य सूत्रधारांना संरक्षण मिळत असल्याच्या चर्चा आहेत, ज्यामुळे कासार यांच्या बदलीची मागणी जोर धरू लागली आहे.

पोलिसांच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह, अधिवेशनात मुद्दा गाजणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या आशिर्वादाने कासार यांच्यावर कारवाई टाळली जात असल्याची चर्चा जोरात आहे. काही महिन्यांपूर्वी जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी थेट महाजन यांच्यावर आरोप केले असून, पोलिस तपासात हस्तक्षेप होत असल्याचा दावा केला होता. मॉब लिंचिग प्रकरणातील आरोपीचे नाव फिर्यादीत घेऊ नका असे म्हणत फिर्यादीवर दबाव आणणारे जामनेरचे पोलिस निरीक्षक मुरली कासार यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस सय्यद तौफिक यांनी केली आहे. निरीक्षक मुरलीधर कासार यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आगामी हिवाळी अधिवेशन काळात विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले असल्याचे सय्यद तौफिक यांनी सांगितले आहे. तसेच या निवेदनाची प्रत आमदार रोहीत पवार यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकरण राजकीय वादाचे रूप घेत असून, पोलिस निरीक्षक कासार यांच्या भूमिकेवरून पोलिस खात्याच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दोन्ही निरीक्षकांना वेगवेगळा न्याय
गेल्या वर्षी जळगाव एमआयडीसी हद्दीत अवैध गॅस भरणा केंद्रात झालेल्या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये घडलेल्या या दुर्घटनेत ओम्नी व्हॅनमध्ये गॅस भरताना स्फोट झाला, ज्यामुळे संपूर्ण शहर हादरले. याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची कंट्रोल रूमला बदली करण्यात आली होती. जामनेरमध्ये देखील नुकतेच एका अवैध गॅस भरणा केंद्रात सिलेंडरचा स्फोट झाला होता. या गंभीर घटनेनंतरही कासार यांना का अभय मिळत आहे? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

हाकेच्या अंतरावर अवैध धंदे
जामनेर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व्यापारी संकुलात जागोजागी सट्टा, जुगाराचे अड्डे बिनधास्त सुरू आहेत. कासार यांच्या कारभारातील ढिसाळपणा आणि राजकीय दबावामुळे पोलीस यंत्रणेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. स्थानिक नागरिक आणि विरोधी पक्षांकडून कासार यांच्या तात्काळ बदलीची मागणी होत असून, जर निकम यांना नियम लागू होत असेल तर कासार यांना अपवाद का? पोलिस खात्याने या मागणीची दखल घेऊन निष्पक्ष कारवाई करावी, अन्यथा जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मंत्री महाजन, पोलीस अधिक्षकांच्या भुमिकेकडे लक्ष
जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्यावर कारवाई करण्यासाठी आगामी अधिवेशनात मुद्दा मांडला जाऊ शकतो. निकम यांच्या बदलीला एका सामाजिक कार्यकर्त्याने दिलेला आंदोलनाचा इशारा कारणीभूत ठरला होता. जामनेरसह जिल्ह्याचे नाव बदनाम होत असताना मंत्री गिरीश महाजन आणि पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी हे कार्यवाही का करत नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे. दोघांच्या भुमिकेकडे जनतेचे लक्ष लागून असून पुढे काय होणार हा प्रश्न आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button