मुंबई-आग्रा महामार्गावर हत्यारांची तस्करी उघड ; धाराशिव जिल्ह्यातील तिघे अटकेत
दोन गावठी पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे जप्त

मुंबई-आग्रा महामार्गावर हत्यारांची तस्करी उघड ; धाराशिव जिल्ह्यातील तिघे अटकेत
दोन गावठी पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे जप्त
धुळे (प्रतिनिधी) : मुंबई-आग्रा महामार्गावर हत्यारांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. या कारवाईत दोन गावठी पिस्तुलं (कट्टे) आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, अटकेत असलेल्या दोघांवर धाराशिव जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
मध्य प्रदेशातून हत्यारांची तस्करी, पोलिसांची विशेष मोहीम
मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर गावठी शस्त्रांची तस्करी होत असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावर संशयित वाहनांची तपासणी आणि गस्त वाढवली.
आज मध्य प्रदेशातून एका कारमधून शस्त्रांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस अंमलदार संजय पाटील, पवन गवळी, आरिफ पठाण, सचिन गोमसाळे, देवेंद्र ठाकूर, मयूर पाटील, राजीव गिते यांच्या पथकाला कारवाईसाठी तैनात केले.
मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल मुल्लाजी समोर पोलिसांनी एमएच-०४-एचवाय-३२३० या क्रमांकाची कार थांबवली. झडती घेतली असता, धाराशिव जिल्ह्यातील मारुती नागनाथ माने आणि नाना अंकुश माने यांच्याकडे गावठी बनावटीची दोन पिस्तुले आणि प्रत्येकी दोन जिवंत काडतुसे आढळून आली. गाडीचा चालक ज्ञानेश्वर रामलिंग कदम याने या दोघांना मदत केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
प्राथमिक तपासात मारुती माने आणि नाना माने यांच्यावर धाराशिव जिल्ह्यात यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. पोलिसांच्या मते, हे तिघे मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत पुढील चौकशी सुरू केली आहे.