प्रती दिक्षाभूमी उभारण्यासाठी मी वचनबध्द – जयश्री महाजन
जळगाव (प्रतिनिधी) : शहर विकासासाठी तसेच शहराच्या सर्वांगिण प्रगतीसाठी मी कटीबध्द आहे. मात्र त्यासोबतच शहरातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शहरातर्फे मानवंदना देण्यासाठी प्रती दिक्षाभूमी उभारण्यासाठी मी वचनबध्द आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी (दि.१७) पत्रकारांशी बोलतांना केले.
त्या पुढे म्हणाल्या की, शहरातील पिंप्राळा भागातील घरकुलानजिकच्या दहा एकर जागेवर नागपूरच्या दिक्षा भूमीची प्रतिकृती साकरण्याचा निर्णय मी महापौर असतांना महासभा क्रमांक ५२, दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी मंजूर करुन घेतला होता. राज्य शासनाच्या मदतीने तो प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी भविष्यात मी प्रयत्नशील असेन. कारण हा प्रकल्प महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारा असेल, शिवाय यामुळे जळगावच्या पर्यटन व्यवसायातही वाढ होणार आहे.
पर्यटन व्यवसाय वाढल्यास या ठिकाणी इतर व्यवसायांसाठीही संधी निर्माण होवून, इथल्या तरुणांना रोजगार मिळण्यासह शहराची आर्थिक प्रगतीही साधेल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.