पोलिस ठाण्याच्या आवारात पाच जणांमध्ये हाणामारी; शासकीय कामात अडथळा ,गुन्हा दाखल

पोलिस ठाण्याच्या आवारात पाच जणांमध्ये हाणामारी; शासकीय कामात अडथळा ,गुन्हा दाखल
धरणगाव : धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दुरक्षेत्र येथे चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या पाच जणांनी पोलिस ठाण्याच्या आवारातच एकमेकांशी भांडण करून हाणामारी व शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना सोमवारी २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाळधी येथील मुस्तकिन अजीज पटेल, सिध्दीका मुस्तकिन पटेल, निलेश सुरेश वानखेडे, दर्शन योगेश पाटील आणि अनिकेत धनराज महाजन यांना चौकशीसाठी २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पाळधी दुरक्षेत्रात बोलावण्यात आले होते. चौकशी दरम्यान दुपारी वाद वाढत गेला आणि पोलीस ठाण्याच्या आवारात वरील सर्वांनी परस्परांत शिवीगाळ व हाणामारी केली. या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनिल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे हे करीत आहेत.





