मोठी बातमी : दिलीप खोडपे यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा, वाचा पत्र..
महा पोलीस न्यूज । दि.१६ ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ सदस्य दिलीप खोडपे यांनी आपल्या भाजप सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आपल्या ३५ वर्षाच्या कार्यकाळात पक्ष आणि नेते कसे बदलले, पक्ष सोडताना काय त्रास होतो आहे यासर्वांचा त्यांनी राजीनामा पत्रात उल्लेख केला आहे. दिलीप खोडपे लवकरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाची वाट धरणार असल्याचे बोलले जात असून ती तुतारी हाती घेणार का याकडे लक्ष लागून आहे.
दिलीप खोडपे यांनी दिलेले राजीनामा पत्र जसेच्या तसे, मागील ३५ वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत आलो. जेव्हा पक्षाची परिस्थिती अतिशय खराब होती व टोकाचा संघर्ष करायचा होता, तेव्हा तो संघर्ष मी पक्षाच्या सर्व माझ्या सहकाऱ्यांसोबत केला. मी कधीही पक्षाकडे पद अथवा लाभाची कामे मागितली नाहीत. मी आणि माझ्या सर्व जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संघर्षामुळे मला ते आपसूकच मिळत गेले, तर बऱ्याच वेळेस माझे कार्यकर्ते व सहकाऱ्यांसाठी मी अनेक पदांचा त्यागही केला. परंतु मागील दहा वर्षापासून पक्षामध्ये स्वकर्तृत्वाने मोठे होण्यापेक्षा दुसऱ्याला नालायक ठरवून मोठे होण्याची स्पर्धा सुरू झाली.
पक्षाच्या मूळ ध्येयधोरणांपासून दूर जाऊन कार्यकर्त्यांना डावलण्यात, स्वतःचे खिसे भरण्यात, प्रत्येक गावात पक्षाचे दोन गट उभे करण्यात व दडपशाही करण्यातच पक्षातील लोक व्यस्त असल्याचे मागील दहा वर्षांपासून दिसून आले. गावागावात दोन गट उभे करून आपापसातच वाद लागल्यामुळे पक्षाचेही खूप नुकसान झाले. पक्षाचे नियम व ध्येयधोरणे हे अस्तित्वातच नाहीत असे चित्र आपल्या तालुक्यामध्ये झालेले आहे.
भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर व बदलापूर येथील चिमुकलीच्या तसेच एकापाठोपाठ महाराष्ट्रभरात घडत असलेल्या बलात्कार प्रकरणात आपल्या तालुक्यातील पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी साधा निषेधही नोंदवला नाही, उलटपक्षी प्रकरण सारवासारव करण्यातच सगळे प्रयत्नशील असल्याचे दिसून आले. मी या बाबतीत निषेध नोंदवला असता माझ्या बाबतीत उलट सुलट चर्चा केल्या गेल्या.
दहीहंडी उत्सवा दरम्यान आपला अतिशय जवळचा कार्यकर्ता कैलास पालवे याचा अपघात होऊन त्याला अत्यवस्थ अवस्थेत आपण दवाखान्यात रवाना केले, परंतु आपला एक कार्यकर्ता जीवन मरणाशी संघर्ष करत असताना आपण कार्यक्रम जल्लोषात नाच गाणे करून साजरा केला. यावरून कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सामील होण्याच्या आपल्या पक्षाच्या विचारालाही हरताळ फासली गेली.
तालुक्यातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, नोकरदारांचे, महिलांचे प्रश्न असतील असे एक ना अनेक विषय मागील दहा वर्षांमध्ये मनाला बोचत होते परंतू ते येथे सविस्तरपणे सांगणे शक्य होणार नाही. या परिस्थितीत सुधारणा होईल या आशेने मी प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत राहिलो. मागील ५ वर्षांपासून माझ्या बाबतीत प्रचंड गैरसमज पसरवले गेले आणि हे गैरसमज आपल्याच पक्षातील सहकाऱ्यांनी पसरवले. असे असूनही मी प्रामाणिकपणे व एकदिलाने पक्षाचे काम अविरतपणे सुरूच ठेवले. या सर्व गोष्टी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना माहीत असूनही मला पक्षात अपेक्षित सन्मान कधीही मिळाला नाही व माझ्या बाबतीत उलट सुलट चर्चा चालूच राहिल्या, म्हणजेच या गोष्टींना वरिष्ठांचा आशीर्वाद आहे असे दिसून येते.
वेळोवेळी मी पक्षाच्या विविध कार्यक्रमांमधून व सभांमधून सर्व कार्यकर्त्यांसमोर पक्षात सुरू असलेली चमकोगिरी, प्रसिद्धीची हाव, कार्यकर्त्यांकडे होत असलेले दुर्लक्ष व पैशांना पक्षात आलेले महत्त्व या गोष्टींना उजाळा दिला. तरीही यावर कोणतीही सकारात्मक कारवाई झाली नाही. मागील अनेक वर्षांपासून मला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नाही. हा निर्णय घेताना मला किती वेदना होत असतील याची कदाचित आजचे कार्यकर्ते कल्पना करू शकणार नाही, कारण गेल्या ३५ वर्षातला संघर्ष व त्या संघर्षातून उभे केलेले हे संघटन सोडून जाणे खूप क्लेशदायक आहे. माझ्या या प्रवासात मला एवढे मोठे करणाऱ्या माझ्या सर्व जिवाभावाच्या सहकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मी आजन्म ऋणी असेल.
जामनेर तालुक्यातील जनता, माझे सर्व जिवाभावाचे सहकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवेत हजर असेल. माझा कोणत्याही नेत्यावर अथवा पदाधिकाऱ्यांवर राग किंवा आकस नाही. परंतू, सततची हेटाळणी, अपमानास्पद वागणुक, डावलने, मूळ विचार व ध्येयधोरणांपासून जामनेर तालुक्यात स्वतःच्या डोळ्यासमोर दूर जात असलेला पक्ष याला कंटाळून, माझा स्वाभिमान जपण्यासाठी मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच सर्व पदांचा राजीनामा देत आहे. धन्यवाद.