डीवायएसपी ऑन ड्युटी : जळगाव उपविभागातील अधिकाऱ्यांची घेतली बैठक
महा पोलीस न्यूज | ११ जून २०२४ | लोकसभा निवडणूक आणि निकाल प्रक्रिया नुकतेच संपली असून पोलिसांना आपली नियमीत कर्तव्य बजावण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. आगामी बकरी ईद आणि इतर निवडणुकांच्या अनुषंगाने पोलीस अधिकाऱ्यांनी देखील आपली जबाबदारी सांभाळली असून त्याचाच भाग म्हणून जळगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी आपल्या विभागातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
जळगाव भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी आपल्या कार्यालयात जळगांव उपविभागातील पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी यांची गुन्हे आढावा बैठक मंगळवारी आयोजित केली होती. बैठकीत गुन्हे आढावा तसेच समन्स वारंट बजावणी, प्रतिबंधक कारवाई, मुद्देमाल निर्गती व सीसीटीएनस कार्यप्रणाली तसेच इतर मुद्यांचा आढावा घेण्यात आला. डीवायएसपी संदीप गावीत यांनी आगामी बकरी ईद, कायदा व सुव्यवस्था, प्रलंबित गुन्हे, तपास लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.
बैठकीत जळगांव उपविभागातील अधिकारी व अंमलदार यांनी मे-२०२४ मध्ये गुन्हे उघडकीस आणणारे अधिकारी व अंमलदार, समन्स व वारंटची जास्तीत जास्त बजावणी बजावणी करणारे अधिकारी व अंमलदार, तसेच विशेष मोहीमेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार, जास्तीत जास्त मुद्देमाल निर्गती करणारे अंमलदार, CCTNS कार्यप्रणालीत उत्कृष्ट कामगिरी करणारे अंमलदार तसेच सध्या पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुक – २०२४ मध्ये महत्वाची कामगिरी बजावणारे जळगांव उपविभागातील पो.स्टे. चे गोपनिय शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करुन त्यांनी भविष्यातही अशाच प्रकारची उल्लेखनिय कामगिरी करावी याकरीता त्यांना प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले.
भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार यांना प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात येणार आहे, जेणेकरुन अधिकारी अंमलदार यांच्यात उत्साह वाढून ते उत्कृष्ट कामगिरी करतील, असे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी सांगितले.