डिजिटल युगातील नवी दिशा : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर विद्यापीठात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाच्या वतीने दि. १६ सप्टेंबर रोजी “संगणकीय साक्षरता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर विशेष व्याख्यान व विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विभागप्रमुख प्रा. डॉ. राकेश रामटेके यांनी “डिजिटल सामाजिक परिवर्तन: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात आंबेडकरी विद्यार्थी, प्रशिक्षक आणि अधिकारी यांना सुसज्ज करणे” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. रामटेके यांनी सांगितले की, “डिजिटल युगातील नवी आव्हाने स्वीकारणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग समाजहितासाठी करणे ही काळाची गरज आहे. शिक्षण, रोजगार आणि प्रशासन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका वाढत असून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करून स्वावलंबन साधावे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. आंबेडकर विचारधारा विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विजय घोरपडे यांनी तर कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी गौरव कटारे यांनी मानले. यावेळी सहाय्यक प्राध्यापिका डॉ. पौर्णिमा वहाणे, इतिहास विभागातील डॉ. सावंत व अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापकांची उपस्थिती होती.





