मुख्य न्यायमूर्ती गवई यांच्यावर हल्ल्याचा निषेध; अमळनेर वकील संघाचा न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार

मुख्य न्यायमूर्ती गवई यांच्यावर हल्ल्याचा निषेध; अमळनेर वकील संघाचा न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार
अमळनेर : प्रतिनिधी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मा. भूषण गवई साहेब यांच्यावर अधिवक्ता पांडे राकेश किशोर यांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा अमळनेर वकील संघाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ अमळनेर वकील संघाने बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर २०२७) एक दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर अमळनेर वकील संघाची आपत्कालीन बैठक मंगळवारी (दि. ७ ऑक्टोबर) घेण्यात आली. या बैठकीत हल्ल्याच्या घटनेचा निषेध करत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीत वकील संघाचे अध्यक्ष अॅड. किरण अ. पाटील यांनी सांगितले की,
“हा हल्ला केवळ मा. सरन्यायाधीश गवई साहेबांवर नसून संपूर्ण न्यायव्यवस्था आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांवर झालेला आहे. न्यायदान हे पवित्र कार्य असून त्यावर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीच्या आत्म्यावर प्रहार आहे.”
या घटनेचा निषेध म्हणून अमळनेर वकील संघाने बुधवारी न्यायालयीन कामकाजात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या या निर्णयाचे अमळनेरमधील सर्व अधिवक्त्यांनी समर्थन केले असून, न्यायव्यवस्थेच्या सन्मानासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.






