ब्रेकिंग : जळगावात शाळेत खेळताना नववीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील आर.आर.शाळेत खेळत असताना नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अचानक जमिनीवर कोसळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी साडेतीन वाजता घडली. मृत विद्यार्थ्याचे नाव कल्पेश वाल्मीक इंगळे (वय १४, रा. कठोरा, जि.बुलढाणा, ह.मु.कासमवाडी) असे आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश हा आपल्या कुटुंबासह, म्हणजेच आई, वडील, लहान भाऊ आणि बहिणीसोबत राहत होता. शुक्रवार, ११ जुलै रोजी तो नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेला होता. दुपारी ३ वाजेच्या सुमारास शाळेतील जेवणाच्या सुट्टीदरम्यान, तो इतर विद्यार्थ्यांसोबत खेळत असताना अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला, असे शाळेतील शिक्षकांनी सांगितले. शिक्षकांनी तातडीने त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले.
कुटुंबियांनी केला मारहाणीचा आरोप
खाजगी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने कल्पेशच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, कल्पेशच्या आई-वडिलांनी संशय व्यक्त केला आहे की, त्याच्या मृत्यूमागे शाळेतील काही विद्यार्थ्यांशी झालेला वाद कारणीभूत असू शकतो. त्यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीही त्याचा काही विद्यार्थ्यांशी वाद झाला होता. त्यामुळे शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
..तर मृतदेह ताब्यात घेणार नाही
जोपर्यंत योग्य तपास होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचेही कल्पेशच्या नातेवाईकांनी स्पष्ट केले. कल्पेशच्या पश्चात त्याची आई शीतल, वडील, भाऊ वेदांत आणि बहीण प्रगती असा परिवार आहे. दरम्यान, शाळा प्रशासन सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची प्रक्रिया करत आहे.