मोठी बातमी : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेप
महा पोलीस न्यूज | १९ मार्च २०२४ | मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना २००६ साली झालेल्या लखन भैय्या चकमक प्रकरणात मुंबई हायकोर्टाने जोरदार झटका दिला आहे. लखन भैय्या चकमक बनावट असल्याचे सांगत न्यायालयाने शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा हा निर्णय रद्द ठरवला आहे.
मुंबईत ११ नोव्हेंबर २००६ रोजी वर्सोव्याच्या नाना-नानी पार्कजवळ रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास डी. एन. नगर आणि जुहू पोलिसांनी संयुक्तरित्या रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या यांना चकमकीत ठार केले होते. विशेष तपास पथकाने केलेल्या चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले होते. लखन भैय्या यांच्यासोबत झालेली चकमक बनावट असल्याचे तपासात उघड झाले होते. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील तब्बल १३ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यामध्ये प्रदीप शर्मा यांचाही समावेश होता.
प्रदीप शर्मा हे नेहमीच वादग्रस्त ठरलेले असून त्यांना २००८ साली निलंबितही करण्यात आले होते. महाराष्ट्र पोलीस दलात १९८३ ला उपनिरीक्षक म्हणून भरती झालेल्या प्रदीप शर्मा यांनी १९९० च्या दशकात १२३ एन्काऊंटर केले. त्यामुळे त्यांची ओळख एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी बनली होती. लखन भैय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात २०१० मध्ये त्याला अटक झाली. त्यानंतर तीन वर्षांनी सुटका झाली होती. २०१७ मध्ये त्यांना पुन्हा खात्यात घेण्यात आले. २०१९ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला.अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. याच प्रकरणात काही काळ त्यांनी तुरुंगवास भोगला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना जामीन दिला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत.