
इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क इंग्रजी उजळणी व्याख्यानमाला
PTA महाराष्ट्रचा उपक्रम; ऑनलाईन माध्यमातून परीक्षाभिमुख मार्गदर्शन
जळगाव / अमळनेर प्रतिनिधी इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयातील परीक्षेपूर्व तयारी अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA), महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “परीक्षेला जाता जाता…” या शीर्षकाखाली यशवंत PTA इंग्रजी उजळणी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम पूर्णतः निःशुल्क असून राज्यातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
ही ऑनलाईन व्याख्यानमाला शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत YouTube Live Lecture माध्यमातून पार पडणार आहे. अवघ्या दोन तासांत इंग्रजी विषयाची नेमकी, संक्षिप्त व परीक्षाभिमुख उजळणी करून दिली जाणार असून अंतिम टप्प्यातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम मार्गदर्शक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या व्याख्यानासाठी श्रीनिवास इंग्लिश अकॅडमी, जळगाव येथील प्रसिद्ध इंग्रजी विषयतज्ज्ञ व्यंकटेश राजन अय्यंगार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. परीक्षेत अपेक्षित प्रश्नरचना, लेखन कौशल्य तसेच गुण वाढीसाठी आवश्यक बाबींवर या व्याख्यानात विशेष भर देण्यात येणार आहे.
कार्यक्रमास PTA महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रशांत कासार, महासचिव मोहन गावडे, जळगाव PTA अध्यक्ष सुरेश राजपूत, उपाध्यक्ष हर्षल ठाकूर यांच्यासह PTA ची राज्य कोअर टीम व विविध क्लास संचालक उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील जास्तीत जास्त इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांनी या निःशुल्क संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन PTA तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी भैय्यासाहेब मगर (मो. ९४२३९०४४८३) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.






