Social

Exclusive : गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भिंती, शौचालयात दारूच्या बाटल्या!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात सध्या दिव्याखालीच अंधार असल्याचे पाहायला मिळत आहे. गावभर अवैध गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांनाच शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिकठिकाणी गुटखा खाऊन थुंकल्याने भिंती रंगल्या असून इतकंच नव्हे तर शौचालयात चक्क दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत.

जळगाव शहरासह जिल्ह्यात नेहमी गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ विक्री आणि सेवनकरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असतात. दरमहिन्याला लाखोंचा गुटखा पकडण्यात येतो तर किरकोळ कारवाया देखील सुरू असतात. महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ कलम ११५ (क), ११७ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जाते. तरतुदीचे उल्लंघन केल्यास १२०० रुपये दंडाची देखील तरतूद आहे. तसेच कोटपा कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असतात.

अधीक्षक कार्यालयात ठिकठिकाणी लावल्या सूचना
पोलीस अधीक्षक कार्यालयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ कलम ११५ (क), ११७ बाबतची माहिती आणि कारवाईचा संदर्भ देणारी सूचना ठिकठिकाणी लावण्यात आली आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या आदेशाची प्रत भिंतीवर चिकटवण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे पोस्टर देखील लावण्यात आले आहे. पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी या सूचना आहेत.

अधीक्षक कार्यालयाच्या भिंती रंगल्या ‘लाल’
पोलीस अधीक्षक कार्यालयात अनेक ठिकाणी गुटखा खाऊन थुंकल्याने भिंती लाल झाल्या आहेत. अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेरील खिडक्या, खालील माळ्यावरील खिडकी, प्रथम माळ्यावरील गॅलरी, पाणी पिण्याचे वॉटर कुलर जवळील भिंती लाल झाल्या आहेत. विशेष म्हणजे ज्याठिकाणी थुंकू नये अशा सूचना लावल्या आहेत त्याच ठिकाणी जास्त थुंकलेले दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे पुरुष प्रसाधन गृहात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत.

पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक कारवाई करणार?
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे वार्षिक तपासणी कामी जळगाव जिल्ह्यात दि.२ जानेवारी रोजी येणार आहेत. तत्पूर्वी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी संपूर्ण कार्यालयात तपासणी करून आढावा घेतला. अनेक सूचना करीत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश देखील दिले मात्र सध्या बघता पालथ्या घड्यावर पाणी दिसून येते. पोलीस अधीक्षक कार्यालयातील या प्रकाराबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी हे कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button