शनिपेठ परिसरात रविवारी भव्य नेत्ररोग तपासणी शिबीर
लारण्या नेत्र चिकित्सालय व श्रीरंग क्लिनिकचा उपक्रम : शिबिराचा लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । शहरातील नागरिकांना अत्याधुनिक नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लारण्या नेत्र चिकित्सालय – फेको व लेसर सेंटर आणि श्रीरंग क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.२३ रोजी एकदिवसीय भव्य नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे नेत्रविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, मार्गदर्शन आणि उपचाराची उत्तम संधी मिळणार आहे.
प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.निखील चौधरी (एम.एस.नेत्ररोग–आयुर्वेद) यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या शिबिरात सामान्य ते जटिल अशा सर्व प्रकारच्या नेत्र समस्यांची तपासणी केली जाणार आहे. विशेषतः वृद्धांमध्ये वाढणाऱ्या मोतीबिंदूच्या समस्यांसाठी शिबिरात प्रगत तंत्रज्ञानासह फेको मशीनद्वारे वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रियांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच लेन्सच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, फेको शस्त्रक्रिया, काचबिंदू व नासूर शस्त्रक्रिया यांसह अचूक दृष्टिमापनासाठी कॉम्प्युटराइज्ड तपासणीही करण्यात येणार आहे.
या शिबिराचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तपासणी शुल्क केवळ २० रुपये ठेवण्यात आले असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही नेत्र उपचार सहज उपलब्ध होतील. डोळ्यांतील नंबर बदलणे, दृष्टिदोष, जळजळ किंवा दृष्टी कमी होणे अशा समस्यांसाठी नागरिकांना डॉक्टरांकडून सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे.
नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
शिबिर रविवार, दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आले असून शिबिराचे ठिकाण श्रीरंग क्लिनिक, २२२, शनिपेठ, शनिमंदिर समोरील गल्ली, जळगाव हे आहे. या क्लिनिकचे संचालक डॉ.मुकेश डी.चौधरी (MD—Ayu) आणि डॉ. पालवी चौधरी (MD Medicine—Ayu.) यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी इतकेच नेत्र तपासणीला देखील प्राधान्य देत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






