उधारीचे पैसे उशिरा फेडण्यासाठी महिलेने रचला चोरीचा बनाव
महा पोलीस न्यूज | १२ एप्रिल २०२४ | चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील एका शेतकरी परिवाराकडे उधार घेतलेले पैसे देण्यासाठी पैसेच शिल्लक नव्हते. उधारी मागणाऱ्यांनी तगादा लावल्याने पैसे देण्यासाठी काही वेळ मिळावा म्हणून त्यांनी स्वतःच्याच घरात चोरी झाल्याचा बनाव रचला आणि पोलिसात तक्रार दिली. तपासात सर्व प्रकार उघड झाला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी मिनाबाई संतोष पडवळकर, वय-४१ वर्ष यांनी दि.५ एप्रिल रोजी चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे. येथे तक्रार दिली होती. तक्रारीनुसार त्यांचे शेतातील कापुस व्यापाऱ्याला विकून कापूस विक्रीचे पैसे त्यांना दि.२ एप्रिल रोजी रोख मिळाले होते. दि.४ एप्रिल रोजीचे रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे तळेगाव येथील राहते घराचे कुलूप तोडुन, घरात प्रवेश करुन, घरातील लोखंडी कोठीतुन सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असे मिळुन एकूण २ लाख ४९ हजार किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे. गु.र.क्र. ७५/२०२४ भा.दं. वि. कलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हकीकत, परिस्थितीत होती तफावत
गुन्हयाच्या घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी भेटी देवून गुन्हा उघडकीस आणण्या करीता मार्गदर्शन करून तपास सुचना दिल्या होत्या. चाळीसगांव ग्रामीण पोस्टेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पोहेकॉ युवराज नाईक व पोकॉ किरण देवरे हे करीत असताना त्यांना तपासात गुन्हयाचे फिर्यादी यांच्या सांगण्यात व प्रत्यक्ष परिस्थीतीत तफावत दिसत होती.
साक्षीदारांकडून गवसला धागा
गुन्हयातील साक्षीदार यांच्याकडे चौकशी केली असता त्यात देखील विसंगत येत होती. त्यामुळे फिर्यादीचे सांगण्याबाबत पोलिसांना संशय बळावला. साक्षीदारांच्या सांगण्यानुसार त्यांनी फिर्यादी मिनाबाई पडवळकर यांना शेतीकामासाठी वेळोवेळी उसने पैसे दिले होते. पैसे त्यांना मिनाबाई यांनी त्यांचे शेतातील कापुस जानेवारी २०२४ मध्ये विकला होता त्यावेळी परत केले होते. तसेच काही साक्षीदारांचे सांगणे नुसार देखील मिनाबाई पडवळकर यांचा माहे जानेवारी २०२४ मध्ये कापुस विकला गेला होता.
हात उसनवारीचे पैसे थकले
कापसाचे पैसे मिळाल्यावर देखील काही साक्षिदारांकडुन हात उसने घेतलेले अथवा उधारीचे पैसे त्यांनी परत केले नाही. त्यामुळे त्यांनी मिनाबाई यांचेकडे वारंवार घेतलेले उसने पैशाची मागणी केली. परंतू मिनाबाई यांनी प्रत्येक वेळी त्यांना तुमचे पैसे देते असे सांगुन वेळ मारुन नेत राहिल्या. त्यामुळे मिनाबाई पडवळकर यांनी दिलेल्या तक्रारी बाबतचा पोलीसांचा संशय खरा ठरल्यामुळे, त्यांचेकडे पुन्हा कसून चौकशी केली असता त्यांनी सत्य हकिकत सांगितली.
स्वतःच रचला चोरीचा बनाव
मिनाबाई यांनी जानेवारीत कापूस विक्रीतून जानेवारी काही लोकांना त्याचवेळी पैसे दिले होते. तसेच त्यांनी गावातील पाच एकर शेती ताबेगहाण ठेवली होती व त्याचे पैसे त्यांनी शेत मालकाला रोख स्वरुपात दिले होते. त्यामुळे त्यांनी गावातील आणखी काही लोकांकडुन उसने घेतलेले पैसे व खते, बी बीयाण्यांचे उधारीचे पैसे परत देण्यासाठी त्यांचेकडे पैसे शिल्लक नव्हते. लोक त्यांचेकडे त्यांचे पैशासाठी तगादा लावत होते. त्यामुळे श्रीमती मिनाबाई पडवळकर यांना पैसे घेणाऱ्यांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी काही दिवसांचा अवधी पाहिजे असल्यामुळे त्यांनी दि.५ रोजी स्वतः पहाटे लवकर उठून घराच्या दरवाजास लावलेले कुलूप तोडून घरात जावून तेथील सामान अस्ताव्यस्त करून घरात चोरी झाल्याचा बनाव केला होता.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, चाळीसगांव ग्रामीण पोस्टेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पोहेकॉ युवराज नाईक व पोकॉ किरण देवरे यांनी केली आहे. दरम्यान, चोरी झाल्याचा खोटा बनाव करुन पोलीस यंत्रणेला वेठीस धरल्यामुळे मीनाबाई संतोष पडवळकर यांचे विरोधात पुढील कायदेशिर कारवाई चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे. यांचेकडून करण्यात येणार आहे.
..तर होईल कायदेशीर कारवाई
पोलीस जनेतेच्या सेवेसाठी व त्यांना निर्माण होणाऱ्या अडीअडचणींचे कायदेशीर मार्गाने निराकरण करण्याकरीता २४ तास तत्पर आहेत. परंतू जर कुणी अशा प्रकारे स्वतःचे स्वार्थापोटी, पूर्व वैमनस्यातुन अथवा इतर काही कारणास्तव पोलीस स्टेशनला खोटी तक्रार देवुन खोटा गुन्हा दाखल करणे असा प्रकार करत असेल तर संबंधित तक्रारदार याचे विरोधात प्रचलित कायदयान्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे सपोनि प्रवीण दातरे यांनी कळवले आहे.