शेतीच्या वादातून पिता-पुत्राला, पुतण्याकडून बेदम मारहाण
महा पोलीस न्यूज | ८ मार्च २०२४ | एरंडोल तालुक्यातील नागदुली शिवारात शेतीच्या जुन्या वादातून पिता – पुत्राला चुलत्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना दि.६ रोजी घडली आहे. एरंडोल येथे उपचारार्थ दाखल असताना तिथे देखील धमकी देण्यात आल्याने तक्रारदार जळगाव येथे उपचारार्थ दाखल झाले. याप्रकरणी जळगावात जाबजबाब नोंदवून गुन्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यातून एरंडोल पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, एरंडोल तालुक्यातील रंवजे येथील विठ्ठल चिंतामण कोळी व त्यांचे भाऊ शिवाजी चिंतामण कोळी यांचे शेत नागदूली शिवारात असून दि.६ मार्च रोजी विठ्ठल कोळी व भाऊ शिवाजी हे शेतात काम करीत असताना त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर कोळी याने वडील विठ्ठल कोळी यांना शेतातील बांधावर उभे राहून दुसऱ्या टोकाला उभे असल्याने डबा आणला आहे हे सांगायला फोन केला. तेव्हा ‘दादा ते मला मारायला येत आहे’ असे त्याने सांगितल्याने विठ्ठल कोळी यांनी त्यादिशेने धाव घेतली.
शेतात विठ्ठल कोळी यांचा चुलत पुतण्या रामकृष्ण कोळी, त्याची पत्नी राधा रामकृष्ण कोळी व त्यांचे पुतणे मुकेश गोविंदा कोळी, किरण गोविंदा कोळी हे कोयता, विळा, कुऱ्हाड व काठीने ज्ञानेश्वर यास मारहाण करीत होते. विठ्ठल कोळी व त्यांचा भाऊ हे ज्ञानेश्वर यास वाचवण्यासाठी आले असता राधाबाईने काठीने मारहाण केली व मुकेश याने विठ्ठल कोळी यांना खाली पाडले. तेव्हा हाताला चावा घेतल्याने मुकेशने त्यांना सोडले व कुऱ्हाडीच्या मागील बाजूने पाठीवर व मांड्यावर मारहाण केली.
पिता पुत्र याविषयी तक्रार दाखल करण्यासाठी एरंडोल येथे आले असता त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात देखील रामकृष्ण कोळी व त्यांचे सहकारी व राधाबाई हिची बहिण संगीता व तीचे पती यांनी दवाखान्यात येऊन शिवीगाळ व दमदाटी केली. जखमींना त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. ज्ञानेश्वर यास चक्कर व उलटी होत असल्याने त्यास खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
याबाबत जळगाव पोलिसांनी जाबजबाब नोंदवून गुन्हा एरंडोल येथे वर्ग केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.