जळगावात गोमांस बाळगणारे चौघे अटकेत, एमआयडीसी पोलिसांची कारवाई
महा पोलीस न्यूज | ७ जून २०२४ | जळगाव शहरातील मासूमवाडी परिसरात विक्रीसाठी अवैधपणे गोमांस बाळगणाऱ्या ४ जणांवर एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी दि.५ जून रोजी सकाळी ११ वाजता कारवाई केली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात अल्पवयीन मुलासह चौघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरातील मासूमावाडी परिसरात विक्रीसाठी गोमांस आणल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीसाच्या पथकाने बुधवारी कारवाई केली. या ठिकाणी चार जणांकडून पोलिसांनी गोमांस जप्त केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल गणेश सुरेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुजाहिद मोहम्मद जाबीर (वय-३२), शेख अनवर शेख शकीर कुरेशी (वय-३०), नेहाल खान नूरखान कुरेशी (वय-५७) आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड हे करीत आहे.त्यांच्याकडून १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. न्यायमूर्ती श्रीमती एम एम बडे यांनी ५ दिवस पोलीस कस्टडी सुनावली आहे. संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दत्तात्रय पोटे, राजेंद्र उगले, विश्वास बोरसे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, सचिन मुंढे, गणेश ठाकरे, छगन तायडे, संजीव मोरे आदींनी केली आहे.