Crime

ब्रेकिंग : सुप्रसिद्ध हॉटेलच्या रूममध्ये सुरू असलेला हाय प्रोफाईल जुगार उधळला, २० लाखांचा ऐवज जप्त

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील हॉटेल रॉयल पॅलेसच्या रूम नंबर २०९ मध्ये जुगार खेळणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकला. एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रूम बूक करून जुगार खेळवला जात असल्याची कारवाई अनेक वर्षानंतर जळगावात झाली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.१० जुलै रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलीस उप निरीक्षक शरद बागल, हवालदार अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, संदिप चव्हाण, किशोर पाटील, रविंद्र कापडणे, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव अशांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी हॉटेल रॉयल पॅलेस, जयनगरच्या रुम क्रमांक २०९ मध्ये काही इसम आपले स्वतःचे फायदयासाठी तीन पत्ती खेळत असल्याचे सांगितले. तसेच त्याठिकाणी कारवाई करणेबाबत उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत जळगाव भाग यांचेकडून कायदेशीर कारवाईकामी योग्य ते आदेश घेतले आहे. व त्यांनी कारवाई बाबत लेखी परवानगी दिली आहे. तुम्ही त्याठिकाणी जावून योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले.

हॉटेलमध्ये पायी पोहचले पथक
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आपले वाहन सागर पार्क येथे लावून हॉटेल रॉयल पॅलेस येथे पायी पोहचले. पथक हॉटेलच्या दुसऱ्या माळयावर असलेल्या रुम नं. २०९ च्या बाहेर थांबून कानोसा घेत असता त्यामधून काही इसमांचा जोर जोऱ्यात बोलण्याचा आवाज येत होता. त्यातील काही इसम “हे माझी ५०० रुपयाची चाल”, दुसरा इसम “हे माझी १००० ची चाल” व काही इसम चाल करतो असे बोलल्याचा आवाज ऐकू येत होता. त्यावरून पथक आणि पंचाची खात्री झाली की, त्याठिकाणी काही इसम हे तीन पत्ती जुगार खेळत आहे.

मध्यरात्री पथकाने टाकला छापा
पथकाने केलेल्या कारवाईत हॉटेलमध्ये पप्पुजी, वय-४४, रा. जळगांव, रुखील, वय-३२, रा.एम.आय.डी.सी., जळगांव, भावेश पंजोमल मंधाण, वय-३७, रा.राजाराम नगर सिंधी कॉलणी, जळगांव, मदन सुंदरदास लुल्ला, वय-४२, रा.गणपतीनगर जळगांव, सुनील शंकरलाल वालेचा वय-४०, रा.सिंधी कॉलनी कंवरनगर, जळगांव, अमीत राजकुमार वालेचा वय ४५, रा.गणेशनगर जळगांव, विशाल दयानंद नाथानी, वय-४८, रा. गणेश रा.गायत्रीनगर घर नं.७० जळगांव, कमलेश कैलाशजी सोनी, वय-३६, रा. वाघुळदे नगर, पिंप्राळा रोड, जळगांव हे मिळून आले.

२० लाखांचा मुद्देमाल जप्त
रॉयल पॅलेस येथे जावून स्था.गु.शा. पथकाने खात्री केली असता हॉटेल मधील रुम नं.२०९ हा मदन लुल्ला याचे नावावर आरक्षीत केला होता. त्याठिकाणी जावून छापा कारवाई केली असता कारवाई दरम्यान ८ इसमांकडून एकुण १९ लाख ९७ हजार रुपये किमतीचे रोख रक्कम व वेगवेगळया कपंनीचे १३ मोबाईल हॅन्डसेट असा मुद्देमाल मिळून आला आहे. याप्रकरणी सहाफौ अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात सी.सी.टि.एन.एस.क्र.२५३/२०२५, महा. जुगार कायदा कलम १२ (अ), ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button