तांबापुरा येथील मच्छी बाजार परिसरातून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त

तांबापुरा येथील मच्छी बाजार परिसरातून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी I एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तांबापुरा येथील मच्छी बाजार परिसरातून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना त्यांच्या गोपनीय माहितीदाराकडून मच्छी बाजार परिसरात एक व्यक्ती गांजाची चोरटी विक्री करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके आणि इतर कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.
पथकाने सापळा रचून मेहमुद शेख मेहबुब (वय ५९, रा. मच्छी बाजार, तांबापुरा) या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता, दोन गोण्यांमध्ये ९३,१५० रुपये किमतीचा एकूण १५ किलो ५२५ ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी तातडीने पंचांच्या उपस्थितीत हा गांजा जप्त केला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांच्या फिर्यादीनुसार एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मेहमुद शेख मेहबुब याला २ सप्टेंबर २०२५ रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक राहुल तायडे आणि चेतन पाटील करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.






