गुजरातचा वॉन्टेड आरोपी अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । गुजरातमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला एक आरोपी अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या आरोपीला स्थानिक अमळगावातून पकडून गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.
मनोज शिवाजी पाटील (वय ३४, रा. अमळगाव) असं या आरोपीचं नाव असून, त्याच्यावर गुजरात आणि बिल्लीमोरा येथे खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या १० ते १२ गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता.
गुजरात पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे मदत मागितली होती.
यानुसार, निकम यांनी उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांच्यासह हेडकॉन्स्टेबल विजय भोई, राहुल पाटील आणि प्रशांत पाटील यांच्या पथकाला अमळगावात पाठवले. गावात आरोपीची दहशत असल्याने सुरुवातीला कोणीही त्याचे घर दाखवायला तयार नव्हते. मात्र, एका व्यक्तीने लांबून घर दाखवल्यानंतर पोलिसांनी मनोज पाटीलच्या घराला वेढा घातला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने मागील दाराने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि नंतर गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले.