चाळीसगावात हिंदू स्मशानभूमीच्या जागेवरून वाद; राष्ट्रीय जन मंच पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

चाळीसगाव|भूषण शेटे : येथील नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर ४२५/क मधील हिंदू स्मशानभूमीसाठी असलेली १ एकर जागा त्वरित जनतेसाठी खुली करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय जन मंच पक्षाने दिला आहे. नगरपालिकेने ३३ वर्षांपूर्वी मंजूर केलेली ही जागा अद्याप उपलब्ध करून न दिल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मालेगाव-धुळे रोडवरील महाराणा प्रताप चौकाजवळ, के. आर. कोतकर कॉलेजच्या बाजूला असलेल्या सर्वे नंबर ४२५/क मधील १.१७ हेक्टर (सुमारे २.९ एकर) जमीन विविध समाजासाठी स्मशानभूमी म्हणून नगरपालिकेने मंजूर केली होती. यातील १ एकर जागा हिंदू स्मशानभूमीसाठी १२ जुलै १९९१ रोजीच्या ठराव क्रमांक ११२३ नुसार मंजूर झालेली आहे.
नागरिकांची पायपीट थांबवण्याची मागणी
सध्या धुळे रोड, मालेगाव रोड, करगाव रोड, पंचशील नगर, जुना मालेगाव रोड नाका, शिव कॉलनी, पोस्टल कॉलनी, नवलेवाडी, आदर्श नगर, श्रीकृष्ण कॉलनी, प्रभू रामचंद्र नगर, डेराबर्डी परिसर, वामन नगर, शंभो नगर या परिसरातील सुमारे ५० ते ६० हजार हिंदू समाज बांधवांना अंत्यसंस्कारासाठी घाट रोडवरील नदीलगतच्या स्मशानभूमीत ४ ते ५ किलोमीटरचा लांबचा प्रवास करून जावे लागते. यात रेल्वे पूल ओलांडून जावे लागणे, ही एक मोठी अडचण आहे.
गेल्या ३३ वर्षांपासून ही जागा असूनही तिचा वापर होत नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संदीप लांडगे यांनी १० मे २०२३ रोजी प्रांताधिकाऱ्यांकडे या जागेची मागणी केली होती. त्यानंतर सुरू असलेल्या पाठपुराव्यामुळे, भूसंपादन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर रचना विभाग आणि भूमी अभिलेख विभाग यांच्याकडून आवश्यक ती परवानगी आणि अहवाल प्राप्त झाले आहेत.
नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दिरंगाईचा आरोप
प्रांताधिकाऱ्यांनी १० जुलै २०२५ रोजी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांकडून आरक्षण अहवाल आणि जागा वाटपाचा अंतरिम अहवाल मागवला आहे. मात्र, गेल्या एका महिन्यापासून नगरपालिकेचे नगर रचना अभियंता हा अहवाल देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप राष्ट्रीय जन मंच पक्षाने केला आहे. यामुळे हिंदू स्मशानभूमीला अंतिम मंजुरी मिळण्यास विलंब होत आहे.
राष्ट्रीय जन मंच पक्षाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन, नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी त्वरित अहवाल सादर करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी केली आहे. या मागणीची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे हिंदू समाजाची होत असलेली गैरसोय थांबवावी अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर राष्ट्रीय जन मंच पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास आर. वाघ, प्रदेश सचिव संदीप लांडगे, जळगाव जिल्हा अध्यक्ष देविदास हटकर, चाळीसगाव तालुकाध्यक्ष सुरेश अर्जुन वेळीस, चाळीसगाव शहर सचिव सचिन शेटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.






