
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव येथील एलसीबीने जनावरे चोरीच्या गुन्ह्यात पकडलेले दोन कुख्यात संशयीत आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाले. घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी तत्काळ चौघांना निलंबित केले असून मुख्यालयात रवानगी करण्यात आली आहे. चौघांच्या निलंबनावरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे बोलले जात आहे. मुळात कसूर झाल्याने पोलीस अधिक्षकांनी ही कारवाई केली असून जर हे चुकीचे असेल तर यापूर्वी निलंबन किंवा बदली केलेल्या सर्वांवर केलेली कार्यवाही देखील बेकायदेशीर म्हटली जाईल.
असे आहे संपूर्ण प्रकरण
जनावरे चोरीच्या गुन्ह्यात पकडलेले दोन संशयीत आरोपी आरोपी शाकीर शाह अरमान शाह आणि अमजद शेख फकीर कुरेशी यांना जळगाव एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्यांना अमळनेर घेऊन जात असताना सती माता मंदिराच्या अंडरपासमध्ये वाहनाचा वेग कमी होताच, दोघांनी मागच्या सीटवरून उडी मारत पळ काढला होता. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीचे प्रवीण मांडोळे, संदीप पाटील, हरीलाल पाटील, राहुल कोळी या पोलिसांना निलंबित केले होते. दि.३१ ऑक्टोबर रोजी त्यांना मुख्यालय जमा करण्यात आले आहे.
अनेकदा आरोपींनी केले आहे पलायन, कारवाई मात्र..
एलसीबीच्या तावडीतून पलायन केलेल्या दोघांना पथकाने मोठ्या शिताफीने दोन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना दिल्ली व दोंडाईचा येथून अटक करीत अमळनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी पळून जाणे ही काही नवीन गोष्ट नाही. अनेकदा असे प्रकार घडले असून तेव्हा देखील अधिक्षकांनी कारवाई केली आहे. काही वेळात किंवा काही तासात आरोपी मिळून देखील येतो मात्र शिस्त आणि कर्तव्याचा भाग म्हणून कारवाई केली जाते. गेल्या वर्षीच फक्त एक संशयीत आरोपी शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीतून पळून गेल्यावर कारवाई करण्यात आली नव्हती हा एक अपवाद वगळता इतर प्रत्येक प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.
..तर त्या सर्व कार्यवाही बेकायदेशीर
पोलीस प्रशासनात आजवर गेल्या काही वर्षाच्या कालावधीत करण्यात आलेल्या कार्यवाही लक्षात घेता जिल्हा रुग्णालयात बंदिवान कैद्याला मोबाईल वापरू दिल्याने ४ निलंबित, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचा आरोपी निसटल्याने दोघे निलंबित, चाळीसगाव येथे खंडणीचा आरोप झाल्याने १ निलंबित, ट्रक चालकाकडून पैसे घेतल्याने ३ निलंबित (१ व्हिडिओत दिसत नव्हता), एलसीबीत २ वर्षात व्हिडिओमुळे ४ निलंबित, शनिपेठ पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेतील ४ जणांची बदली, ड्रग्स आरोप प्रकरणात पीएसआय निलंबित, महिलेच्या तोंडी तक्रारीवरून पोलीस निरीक्षक निलंबित, पोलिसाने पार्टीत नृत्य केल्याने निलंबन, वर्दीत हाणामारी केल्याने मुक्ताईनगरला १ निलंबित, मद्यपान केल्याने चाळीसगावच्या १ कर्मचाऱ्याची बदली बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्याने रावेरला १ निलंबित, वाळू व्यावसायिकाला मारहाण केल्याने डीवायएसपी कार्यालयातील दोघांवर कारवाई यासह गेल्या १० वर्षात तर जवळपास १५० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सध्या केलेली कार्यवाही चुकीची असेल तर आजवर केलेल्या सर्व कार्यवाही बेकायदेशीरच म्हटल्या जातील.
घाईचे निर्णय आणि राजकीय हस्तक्षेप
गेल्या काही कालावधीत अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर विविध प्रकारचे आरोप करण्यात आले. काही राजकीय होते तर काही अंतर्गत कुरघोडीतून झालेले आरोप होते. आरोपांनंतर लागलीच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलीस अधिक्षकांनी त्यात तडकाफडकी निर्णय घेतले आणि आपली जबाबदारी पार पाडली मात्र नंतर तेच निर्णय घाईचे ठरले अशी चर्चा होऊ लागली. काही प्रकरणात पुन्हा राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप करून सारवासारव केली आणि कार्यवाहीचे स्वरूप सौम्य करण्याचे सांगितले. राजकीय हस्तक्षेपनंतर काहींचे पुनर्वसन देखील करण्यात आले.
पोलीस देखील माणूसच असतो..
कोणताही शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी आपले कर्तव्य बजावत असताना आपल्याकडून चूक होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेत असतो मात्र तरीही काही वेळेस अनावधानाने किंवा बेफिकीर वागण्याने चूक होतेच. चूक व्हावी असे त्याला कधीही वाटत नाही. पोलिसांचे देखील तसेच असते. सध्या सर्वत्र खात्यांतर्गत अंतर्गत राजकारण, मिडिया ट्रायल, हेवेदावे, राजकीय हस्तक्षेप असले प्रकार सुरू असल्याने पोलीस सहज टार्गेट होतात. पोलीस देखील माणूसच असतो म्हणून एखाद्यावर कारवाई झाली तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल असे वागू नये. उलटपक्षी त्याला आधार देत पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करणे हीच खरी माणुसकी आहे.






