भुसावळ शहर हादरले : कौटुंबिक वादातून चाकूने सपासप वार करून तरुणाचा खून
एक जण गंभीर ; घटनेने शहरात खळबळ

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील अयान कॉलनीत कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा खून तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१२ सप्टेंबर) घडली. पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या नातेवाईकावर चाकूने हल्ला करून पतीने त्याचा खून केला, तर पत्नीच्या वडिलांना गंभीर जखमी केले.
सुभान शेख भिकन याचे पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर पत्नीने धुळ्यातील वडील शेख जमील शेख शकूर (५२) यांना फोनवर माहिती दिली. यानंतर रात्री आठच्या सुमारास शेख जमील आपल्या नातेवाईक शेख समद शेख इस्माईल (४०, रा. कंडारी) यांना घेऊन मुलीच्या मदतीला भुसावळला आले. मध्यस्थी करताना वाद तीव्र झाल्याने संतप्त सुभानने धारदार चाकूने समदवर मानेवर, छातीवर व पोटावर वार केले. त्यानंतर त्याने सासरे शेख जमील यांच्यावरही वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
दोघांनाही तातडीने भुसावळ ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी शेख समद यांना मृत घोषित केले, तर शेख जमील यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली व संशयित आरोपी सुभान शेख याला ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया सुरू केली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृत शेख समद यांच्या पश्चात पत्नी, मुले व भाऊ असा परिवार आहे. मजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
पहा संपूर्ण व्हिडिओ :





