खुशखबर : पालच्या जंगलात एप्रिलपासून सुरू होणार ‘जंगल सफारी’
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेंची पाल येथे जंगल सफारी
महा पोलीस न्यूज | २५ फेब्रुवारी २०२४ | नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दि.२४ रोजी सकाळी ६ वाजता अचानक येवून पाल येथील वन्यजीव क्षेत्र असलेल्या गारबर्डीत पाहणी केली. या क्षेत्रात एप्रिल महिन्यापासून पर्यटन प्रेमीसाठी जंगल सफारी सुरु होत असून त्याची प्रत्यक्ष जंगल सफारी गमे यांनी करून पाल येथील अनुपम विश्रामगृहाची पहाणी करत आढावा घेतला. जळगावकरांना ही एक पर्वणीच ठरणार असून जंगल सफारीमुळे पाल आणि परिसराला पुन्हा वर्दळीचे दिवस येणार आहेत.
पाहणी करताना विभागीय आयुक्त गमे यांच्यासोबत सहाय्यक आयुक्त विठ्ठल सोनवणे, आरएफओ अजय बावणे, प्रवीण दौंड, सुपडू सपकाळे, असणा ठेपले, राजू बोंडल, युवराज मराठे, रवी सोनवणे उपस्थित होते. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या वेळी सांगितले की, गारबर्डी परिसरात सुमारे २७ किलोमीटर परिसरात ३ हजार ३०० हेक्टर जंगलातून जंगल सफारी होणार आहे. त्यासाठी गारबर्डी येथील २० युवकांना आणि जंगलप्रेमी पर्यटकांना जंगलातील संपूर्ण माहिती, प्राण्यांची नावे व इतर माहिती देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
वन्यजीव विभागामार्फत जंगल सफारी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जंगल सफारीच्या गाड्यांचे भाडे तेथील संयुक्त वनहक्क समिती ठरवणार असून गाईडला मात्र एका जंगल सफारीचे ५०० रूपये दिले जातील, असे आयुक्त गमे यांनी सांगितले. तसेच पर्यटन वाढण्यासाठी हा पहिलाच प्रयोग असून यातून स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे गमे यांनी सांगितले.
ब्रिटिश काळात उभारण्यात आलेल्या पाल वनविभागाच्या आवारात असलेल्या अनुपम बगंल्याला नासिक विभागिय आयूक्त गमे यांनी पसंती दिली. वनविभाग व अधिकाऱ्यांनी या अनूपम विश्राम गृहाची देखरेख व्यवस्थित राखल्याने त्याची दाद दिली.
जंगलातील प्राण्यांविषयी घेतली माहिती
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जंगल सफारी करताना आरएफओ बावने यांच्याकडून प्राण्यांविषयी माहिती घेतली. या जंगलात बिबट्या, अस्वल, निलगाय, मोर, माकड, काळ्या ठिपक्यांचे हरीण आदी प्राणी आहेत. त्यातील काही प्राणी श्री. गमे यांना सफारी दरम्यान दिसले. तसेच कुटीया, उंचमाचवे, पानवठे, धबधबा, गारबर्डीतील छोटे धरण, पाल येथील विश्रामगृह आदींची त्यांनी पाहणी केली.
जंगल पाहण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु, वन विभागाच्या नियमांमुळे जंगलात जावून जंगलाची सफर करणे शक्य होत नाही. परंतु आता ही सुविधा वन विभागाच्या वतीने पाल येथे सुरू करण्यात येणार आहे. जंगलातील सफारी मार्गाची दुरुस्ती करून गाईडसह पर्यटकांना ही जंगल सफर घडवण्याचे नियोजन आहे.
– जमीर शेख, उपवनसंरक्षक यावल वनविभाग, जळगाव