संजय गांधी निराधार योजनेसह अन्य पेन्शन योजनांचे मानधन रखडले; लाभार्थी हैराण

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । अमळनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन यांसारख्या विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. यामुळे दिव्यांग, वृद्ध, विधवा महिला आणि निराधार व्यक्तींचे जीवनमान विस्कळीत झाले असून, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रियाज शेख मौलाना, अध्यक्ष स्वतंत्र सेनानी अल्लामा फजले हक खैराबादी (रहें.) स्टडी सेंटर आणि पब्लीक लायब्ररी, अमळनेर यांनी याबाबत तहसीलदार कार्यालयाला निवेदन देत तातडीने मानधन वितरीत करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, अनेक लाभार्थ्यांचे केवायसी (KYC) आणि मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी लिंक नसणे ही मानधन जमा न होण्याची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. यामुळे बँक खात्यांमध्ये अनुदान जमा होण्यास अडचणी येत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याने लाभार्थी सतत तहसीलदार कार्यालयात चौकशीसाठी येत आहेत. त्यामुळे कार्यालयात लाभार्थ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, कार्यालयातील संबंधित कर्मचारी वयोवृद्ध लाभार्थी, निराधार महिला आणि दिव्यांगांना योग्य माहिती देत नसल्याची तक्रारही निवेदनात करण्यात आली आहे. यामुळे आधीच हलाखीचे जीवन जगणाऱ्या या लाभार्थ्यांचे हाल अधिकच वाढले आहेत. त्यांना दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण झाले असून, अनेक वयोवृद्धांच्या जीवावर बेतत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
रियाज शेख मौलाना यांनी आपल्या निवेदनात, कार्यालयाच्या दर्शनी भागात माहितीदर्शक फलक लावण्याची आणि तहसीलदारांनी संबंधित विभागाशी समन्वय साधून थकीत व नियमित मानधन तातडीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची नम्र विनंती केली आहे. या प्रकारामुळे प्रशासकीय दिरंगाईचा फटका थेट गोरगरीब आणि गरजू लाभार्थ्यांना बसत असून, त्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.