कै. भिमराव पांचाळ यांच्या पुण्यस्मरणार्थ अमळगावमध्ये मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर

कै. भिमराव पांचाळ यांच्या पुण्यस्मरणार्थ अमळगावमध्ये मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर
अमळगाव प्रतिनिधी विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभागासाठी ओळखले जाणारे शिरपूर येथे कार्यरत पोलिस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे यांनी आपल्या वडील कै. भिमराव पांचाळ यांच्या १३व्या पुण्यस्मरणार्थ समाजोपयोगी कार्याची परंपरा पुढे नेत यंदा आरोग्यसेवेचा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत अमळगाव येथे मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
स्वतः गरीबीच्या परिस्थितीची जाणीव असून गरिबीतील अडचणी त्यांनी जवळून अनुभवल्यामुळे कोणत्याही गरिबाचे आरोग्य आर्थिक कारणांमुळे बिघडू नये या उदात्त हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य अथवा इतर कोणताही प्रश्न असो—तो समजून घेऊन सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका सुरेश सोनवणे हे सातत्याने बजावत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.
हे शिबिर शंकरा आय हॉस्पिटल, आनंद (गुजरात) आणि वैष्णवी ऑप्टिकल्स, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामुळे अमळगावसह पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा गावातच उपलब्ध झाली असून, नागरिकांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी ठरली.
शिबिराचे आयोजन दिनांक 17 डिसेंबर 2025 (बुधवार) रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 3.00 या वेळेत आदर्श माध्यमिक विद्यालय, अमळगाव येथे करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन सौ. निशा सुरेश सोनवणे (पांचाळ), अमळगाव यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
या मोफत डोळे तपासणी शिबिरात डॉ. ऋषभ जैन व डॉ. भैरव राजपूत यांनी आपल्या तज्ज्ञ सेवेतून रुग्णांची बारकाईने तपासणी केली. शिबिरात एकूण २५० रुग्णांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली, यामध्ये वृद्ध, महिला, तरुण तसेच विविध आजारांनी ग्रस्त नागरिकांचा समावेश होता.
तपासणीनंतर ९५ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरविण्यात आले असून, या रुग्णांना पुढील उपचारासाठी 18 डिसेंबर 2025 (गुरुवार) रोजी आनंद, गुजरात येथे मोफत नेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिबिरासाठी नागरिकांनी आधार कार्डाची झेरॉक्स प्रति व मोबाईल क्रमांक सादर करणे आवश्यक होते. अमळगावसह पंचक्रोशीतील विविध गावांमधून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. विशेषतः तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमळगाव येथील तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक, समाजातील मान्यवर तसेच स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले. शिस्तबद्ध नियोजन, वेळेचे पालन आणि सेवाभावी वृत्तीमुळे शिबिर कोणताही अडथळा न येता यशस्वीरीत्या पार पडले.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून, वेळीच तपासणी व उपचार केल्यास अंधत्व टाळता येऊ शकते हा महत्त्वाचा संदेश समाजात पोहोचला आहे. अशा प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत असून, या उपक्रमाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.






