अमळगावात मरीआई यात्रा उत्सव; लोकनाट्य तमाशांनी रंगणार माहोल.

अमळगाव | पंकज शेटे (ता. अमळनेर) – अमळगाव येथे येत्या १७ ऑगस्ट २०२५ रोजी मरीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. श्रावण महिन्यातील ही जत्रा गावाची पुरातन परंपरा असून दरवर्षी भाविक आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यात्रेचा माहोल रंगतो.
परंपरेनुसार श्रावण महिन्यातील चार आठवडे बाजार मूळ बाजारपेठ सोडून थेट मरीआई मंदिराजवळील बसस्थानक परिसरात भरवले जातात. या पार्श्वभूमीवर रविवारी आयोजित होणाऱ्या यात्रेला परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती लाभणार आहे.
यात्रेतील प्रमुख आकर्षण म्हणून ३ लोकनाट्य तमाशा मंडळांचे प्रयोग रंगणार आहेत. मनोरंजनाबरोबरच पाळणे, झुले, फरसाण व खाद्यपदार्थांची दुकाने, गोडधोड व खेळणी स्टॉल्स यात्रेची रंगत वाढवणार असून परिसरात खरेदी-विक्रीचा गजबजलेला माहोल अनुभवायला मिळणार आहे.
मरीआई हे गावाचे गावदैवत असून “मरीआई नवस पूर्ण करणारी” अशी अख्यायिका आहे. यात्रेदिवशी भाविक मनोभावे दर्शन घेऊन नवस फेडतात. त्यामुळे यंदाही यात्रेला परिसरातील नागरिक, व्यापारी आणि भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.
आयोजक मंडळाने नागरिकांना व भाविकांना “श्रद्धा, परंपरा आणि उत्सवाचा संगम असलेल्या या यात्रेला उत्स्फूर्त उपस्थित राहावे” असे आवाहन केले आहे.






