मृत्यूचा महामार्ग : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुणी ठार, चिमुकला जखमी
महा पोलीस न्यूज । दि.२८ ऑगस्ट २०२४ । जळगाव शहरातून जाणारा महामार्ग मृत्यूचा मार्ग बनला असून मानराज पार्क ते गुजराल पेट्रोल पंपादरम्यान एका ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुणी जागीच ठार झाल्या आहेत. एक वर्षीय चिमुकला जखमी झाला असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मयत रेल गावातील असल्याचे समजते.
जळगाव शहरातील महामार्गावर खड्डेच खड्डे झाले असून ते चुकवण्याच्या प्रयत्नात नेहमीच अपघात होत असतात. बुधवारी दुपारी १.५० वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच.१८.एएस.५३७९ ने खोटेनगर स्टॉपकडून उड्डाण पुलाने मानराज पार्ककडे दोन तरुणी आणि एक चिमुकला जात होते. उड्डाणपूल उतरताच भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. अपघातात दोघींचा जागीच मृत्यू झाला असून चिमुकला जखमी झाल्याचे समजते.
माजी महापौर जयश्री महाजन या एका कार्यक्रमानिमित्त द्वारकानगरकडे जात असताना त्यांना महामार्गावर गर्दी दिसली. अपघात असल्याने लागलीच त्यांनी आपले वाहन त्याठिकाणी आणले आणि मयतांच्या नातेवाईकांना घेऊन बाळ उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णालयात रवाना झाल्या. घटनास्थळी मोठा जमाव जमला असून पोलीस पोहचले आहेत. माजी नगरसेवक अमर जैन देखील मदतकार्य करीत आहेत.