
महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । अमळनेर तालुक्यातील मारवड परिसरातील नदीपात्रात सुरू असलेला बेकायदेशीर वाळू उपसा आता विकोपाला गेला असून, या गंभीर पर्यावरणीय गुन्ह्याकडे प्रशासनाने केलेले ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष संशयास्पद बनले आहे. दिवसाढवळ्या वाळूचे प्रचंड ढीग साठवले जात असतानाही महसूल, पोलीस किंवा ग्रामपंचायतीकडून कोणत्याही ठोस कारवाईचा ‘देखावा’ देखील केला जात नसल्याने नागरिक कमालीचे संतापले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळू माफियांनी अक्षरशः रात्रीचा दिवस केला आहे. ट्रॅक्टर आणि डंपरच्या फौजा रात्रीच्या अंधारात वाळू उपसा करतात आणि ही चोरीची वाळू जवळच्या शेतात किंवा मोकळ्या जागांवर ‘सुरक्षित’पणे साठवून ठेवतात. हा केवळ वाळूचा उपसा नाही, तर नदीपात्राचे ‘लूटपाट’ आहे. या राक्षसी उपशामुळे नदीपात्राची खोली अनेक फुटांनी वाढली असून, परिसरातील भूजल पातळी गंभीररित्या खालावली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि शेतीसाठी पाण्याचा प्रश्न भविष्यात उभा राहिल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रशासनाचे ‘हे’ मौन नव्हे, तर ‘संमती’
जनतेचा थेट आरोप आहे की, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने या अवैध धंद्याकडे ‘डोळेझाक’ नव्हे, तर ‘सक्षम आशीर्वाद’ दिला आहे. वाळूचे ढीग समोर दिसत असतानाही अधिकारी शांत कसे राहू शकतात? या ‘वाळू लुटारांना’ नेमका कोणाचा राजकीय आणि प्रशासकीय ‘आशीर्वाद’ मिळत आहे, ज्यामुळे कारवाईची साधी ‘चर्चा’ देखील होत नाही?” असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहे. या निष्क्रियतेमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे मनोबल गगनाला भिडले आहे. शासनाचा धाक पूर्णपणे संपला असून, हे माफिया पर्यावरणीय नियमांची सर्रास पायमल्ली करत आहेत.
कठोर कारवाई करण्याची मागणी
अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना तातडीने हस्तक्षेप करण्याची, उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि या अवैध धंद्याला मदत करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर स्थानिक प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास दोन दिवसात नूतन जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यासह तक्रार करण्यात येणार आहे.
पर्यावरणीय हानीचा गंभीर धोका!
प्रशासनाच्या या निष्क्रिय आणि संशयास्पद भूमिकेमुळे अमळनेर परिसरात पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. आज नदीतील वाळू लुटली जात आहे, उद्या याच निष्क्रियतेमुळे भूजल आणि नैसर्गिक संसाधने पूर्णपणे संपुष्टात येतील. लवकरात लवकर या वाळू उपसा प्रकरणात महानिष्क्रियता दाखवणाऱ्या प्रशासनावर ताशेरे ओढून गुन्हे दाखल करावेत आणि नदीची ‘लूट’ थांबवावी! अन्यथा, नागरिक जनआंदोलन देखील छेडू शकतात.






