जळगावमध्ये १ फेब्रुवारीला घुमणार हिंदुत्वाचा हुंकार; भव्य ‘हिंदु राष्ट्र जागृती सभे’चे आयोजन

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । हिंदू धर्माच्या गौरवशाली परंपरेचे जतन करण्यासाठी आणि राष्ट्रहितासाठी समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने, जळगाव येथे रविवार, १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य ‘हिंदु राष्ट्र जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. मानराज पार्क येथील श्रीराम मंदिर संस्थानच्या मैदानावर हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांनी दिली.
सभेत ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सभेला उपस्थित राहणारे १० हजारांहून अधिक राष्ट्रप्रेमी नागरिक एकत्रितपणे संपूर्ण वंदे मातरमचे गायन करणार आहेत. सभेच्या ठिकाणी खास शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. याचे उद्घाटन १ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता होईल, तर २ फेब्रुवारी दुपारी १ वाजेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहील. सनातन संस्थेतर्फे राष्ट्र, धर्म, अध्यात्म, आयुर्वेद आणि बालसंस्कार या विषयांवरील अनमोल ग्रंथसंपदा व माहितीपर फलक लावले जातील.
या सभेला प्रामुख्याने लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा (३० वर्षे देशसेवा केलेले माजी सैन्य अधिकारी), सद्गुरू स्वाती खाडये (सनातन संस्था), अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर (राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधिज्ञ परिषद), प्रशांत जुवेकर (उत्तर महाराष्ट्र संघटक, हिंदु जनजागृती समिती) हे मान्यवर संबोधित करणार आहेत.
“जसा रावणाचा विनाश करण्यासाठी रामाचा आणि औरंगजेबाच्या अत्याचाराविरुद्ध छत्रपती शिवरायांचा उदय झाला, त्याचप्रमाणे आजच्या काळात धर्माच्या बाजूने उभे राहणे ही काळाची गरज आहे. जळगावमधील हिंदूंनी संघटित शक्तीचे दर्शन घडवण्यासाठी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन प.पु. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी केले आहे.
वाहनफेरीच्या नियोजनात बदल
राज्यातील शासकीय दुखवट्यामुळे सभेच्या प्रचारार्थ ३० रोजी आयोजित करण्यात आलेली वाहनफेरी आता ३१ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत काढली जाईल. ही फेरी ‘नेहरू चौक (बिग बाजार)’ येथून सुरू होऊन ‘पिंप्राळा येथील छत्रपती शिवराय स्मारक’ चौकात विसर्जित होईल. या सभेला जळगावकर नागरिकांनी, शिवप्रेमींनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदु समाज आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.






