निंभोरा येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन: हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक

निंभोरा येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन: हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक
निंभोरा (ता. रावेर): अँटी करप्शन मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने निंभोरा येथील मशिदीमध्ये रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी आणि विश्वशांतीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव अधिकार जळगाव जिल्हाध्यक्ष व सहकार महर्षी प्रल्हाद भाऊ बोडे होते, तर आयोजक व विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे (अण्णा) आणि प्रमुख अतिथी म्हणून मशिदीचे अध्यक्ष हाजी करीम मणियार व मुतवल शरीफ पठाण खान उपस्थित होते.
प्रा. संजय मोरे यांनी आपल्या मनोगतात रमजान आणि इस्लाम धर्मातील मूलभूत तत्त्वांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, पैगंबर मुहम्मद (सलअम) यांचा जन्म २० एप्रिल ५७१ रोजी मक्केत झाला. त्यांचे वडील अब्दुल्लाह आणि आई अमीना यांच्या निधनानंतर त्यांचे पालनपोषण आजोबा अबू मुत्तलिब यांनी केले. औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांना अल्लाहने अफाट ज्ञान बहाल केले होते. इस्लामच्या पाच मूलभूत तत्त्वांपैकी एक असलेला रोजा हा रमजान महिन्यात पाळला जातो. रमजान हा संयम, आत्मशिस्त आणि दानधर्माचा काळ असून, या काळात कुराण पठण आणि तरावीह प्रार्थनेला विशेष महत्त्व आहे. रमजानच्या समाप्तीनंतर ईद-उल-फित्र हा सण साजरा केला जातो, जो प्रेम, शांती आणि बंधुभावाचे प्रतीक आहे.
प्रा. मोरे यांनी पुढे नमूद केले की, रोजा इफ्तार पार्टी हे विश्वशांती, समता, बंधुत्व आणि एकमेकांबद्दल आदर व प्रेमाचे खरे प्रतिबिंब आहे. या कार्यक्रमात रोजा सोडल्यानंतर नमाज अदा करण्यात आली आणि हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सुरुची भोजनाचा आनंद घेतला.
या प्रसंगी प्रल्हाद भाऊ बोडे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाला मौलाना अजगर अली, मुतवल शरीफ खान, हाजी करीम मणियार, शेख करीम, शेख इब्राहिम, आझाद खाटीक, अब्दुल मणियार, युनूस खान, शेख वजीर, शेख गुलाब, शेख अस्लम, सय्यद हाजी मोहम्मद, फिरोज मणियार, जाहिद मणियार यांच्यासह असंख्य हिंदू-मुस्लिम बांधव आणि लहान मुले उपस्थित होती.
या आयोजनाने निंभोरा गावात सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.