काही महिन्यात विरोधकांचे टांगा पलटी, घोडे फरार होणार : ना.गुलाबराव पाटील
महा पोलीस न्यूज । दि.१३ ऑगस्ट २०२४ । हाती बांधायला राखी बहीण हवी एक, बहिणीच्या नात्याला जपायला प्रत्येक घरी हवी लेक. जळगाव जिल्ह्यात ५ लाख २० हजार अर्ज भरले. वर्षाला ४० कोटी रुपये मिळणार आहे. महिलांसह सर्व घटकांसाठी आपण योजना राबवल्या. काही लोक आपल्याबद्दल अफवा पसरवत आहे परंतु शासनाने ३५ हजार कोटी मंजूर केले आहे, म्हणून कुणीही अफवांना बळी पडू नये. येत्या काही महिन्यात विरोधकांचे टांगा पलटी, घोडे फरार होणार आहे. जिल्ह्यात नारपार योजना, केळी महामंडळ, सिंचन योजना, बहिणाबाई स्मारकासह अनेक योजनांसाठी शासनाने निधी दिला. आज इथे बसलेल्या महिला भगिनींची गर्दीच सांगते की ही योजना छप्पर फाड योजना आहे, असे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील म्हणाले.
महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मंगळवारी जळगावात करण्यात आला. सागर पार्क मैदानावर आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील, खा.स्मिता वाघ, आ.राजुमामा भोळे, आ.लता सोनवणे, आ.चंद्रकांत पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले मानपत्र
सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र गीत पार पडले. जिल्ह्यातील काही भगिनींनी मान्यवरांना राखी बांधली व एक सन्मानचिन्ह देण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची एक शॉर्ट फिल्म दाखवल्यावर जिल्ह्यातील सर्वांच्या माध्यमातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. धरणगाव बालकवी स्मारकाचे ई भूमीपूजन करण्यात आले.