जिल्हा पोलीस प्रशासनाच्या पद्मालय सभागृहाचा कायापालट, मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महा पोलीस न्यूज । २५ जुलै २०२४ । जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाच्या पद्मालय बहुउद्देशीय सभागृहाचे जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सुशोभीकरण करण्यात आले. गुरुवारी पालकमंत्री गुलाबराब पाटील, वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
पोलीस मुख्यालय परिसरातील पद्मालय सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराब पाटील, वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री गिरीश महाजन, आ.मंगेश चव्हाण, आ.किशोर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्याधिकारी अंकित, परीरक्षावधीन आयएएस श्रीमती वोझो, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, दोन टप्प्यात जिल्हा पोलीस दलासाठी ७० वाहने दिली आहेत. आजच खास बाब म्हणून डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना स्कार्पिओ वाहने मंजूर केले आहे. जळगावात प्रायोगिक तत्त्वावर १० पोलीस चौकी मंजूर करुन काम सुरु करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखताना आमची पण सर्व योग्य ठेवणे जबाबदारी असते. जिल्ह्यात ज्या पोलीस ठाण्याचे नूतनीकरण करायचे असेल त्यासाठी आम्ही सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रस्तावना करताना पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात आलेल्या निधीतून पाळधी पोलीस ठाणे, रामानंद नगर पोलीस ठाणे, फत्तेपूर पोलीस ठाणे बांधकाम करण्यात येत आहे. तसेच पोलीस पद्मालय सभागृहाचे नूतनीकरण देखील करण्यात आले आहे. पूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात असून देखील याठिकाणी कुणी कार्यक्रम आयोजित करीत नव्हते मात्र नूतनीकरण केल्याने आता आगाऊ नोंदणी होऊ लागली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाला वाहने देखील उपलब्ध करून दिले असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितले.
सूत्रसंचालन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी केले. आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले. कार्यक्रमासाठी पोलीस उपअधीक्षक गृह प्रदीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस कल्याण विभागाच्या रेश्मा अवतारे, राखीव पोलीस कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.