जहाँ विश्वास ही परंपरा हैं.. आर.सी.बाफना ज्वेलर्स, वाचा संपूर्ण वृत्त
महा पोलीस न्यूज | २८ एप्रिल २०२४ | जळगाव जिल्ह्यातील नामांकित सराफ पेढी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे सोने पकडले गेले आणि नयनतारा शोरुममध्ये आयकर विभागाने चौकशी केली अशी बातमी महा पोलीस न्यूजतर्फे प्रसिद्ध करण्यात आली होती. महा पोलीस न्यूजने दिलेले वृत्त खरे असून आयकर विभागाने चौकशी केली खरी मात्र आर. सी. बाफना ज्वेलर्सने आपले ब्रीद वाक्य ‘जहाँ विश्वास ही परंपरा हैं’ हे सार्थ ठरविले आहे. चौकशीत काहीही चुकीचे निष्पन्न झाले नसून सर्व २७ किलो सोने, चांदीचे पार्सल परत देण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत संचालक सुशीलकुमार बाफना आणि सिद्धार्थ बाफना यांनी दिली आहे.
जळगाव शहरापासून जवळच असलेल्या कुसुंबा नाका येथील चेक पॉईन्टवर दि.२० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास लोकसभा निवडणूक संदर्भात तपासणी करताना आर.सी.बाफना ज्वेलरी शोरूमच्या मालाची वाहतूक करणारे सिक्वेल लॉजेस्टिक या कंपनीचे एमएच.१२.व्हीटी.८६२९ हे बोलेरो वाहन प्रांताधिकारी महेश सुधळकर, उपविभागीय अधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पथकाद्वारे थांबविण्यात आले होते. वाहनात सोने, चांदी व हिऱ्यांचे ऐवज असल्याचे वाहनासोबत असलेल्या डिलिव्हरी असिस्टंट बाबासाहेब बबन राठोड या व्यक्तीने पथकाने विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.
पथकाने वाहनसोबत असलेले कोणतेही कागदपत्र चेक न करता, अधिकची चौकशी न करता वाहन एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे जमा केले. तशी स्टेशन डायरीमध्ये सायंकाळी ७.५३ मिनिटांनी क्र.४०/२०२४ नोंद करून पुढील चौकशीकामी सह. आयुक्त आयकर विभाग, सर्कल-१ जळगांव यांना सूचित केले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री आयकर विभागाचे पथक आर.सी.बाफना शोरूमला आले, त्यांनी रात्री चौकशी केली.
दुसऱ्या दिवशी नाशिक येथून आयकर विभागाचे पुन्हा एक पथक आल्यावर त्यांनीही सखोल चौकशी केली. त्यात दागिने ऑर्डर करण्याची पद्धत, दागिन्यांची बील, दागिन्यांचे बील कसे अदा केले त्याबाबतचा तपशील व बिलाप्रमाणे दागिन्यांच्या नोंदी वाहनात असलेल्या तपशीलासोबत मॅच होत आहेत की, हे सगळे क्रॉस चेक केले. त्यानंतर संबंधित अधिकारी वर्गाची खात्री झाली आणि वाहनातील वस्तू मौल्यवान असल्याने योग्य ती दक्षता घेऊन सिक्वेल लॉजिस्टिक यांना वाहन सोडणेबाबत कळविले.
आयकर विभागाच्या सूचनेनुसार काल शुक्रवार दि.२६ एप्रिल रोजी दुपारी एम.आय.डी.सी. पोलिसांनी आर.सी.बाफना शोरूमच्या प्रतिनिधी समक्ष ते वाहन सिक्वेल लॉजिस्टिकच्या प्रतिनिधींकडे सोपवून संबंधित वाहन पोलीस वाहनासोबत सुरक्षितरित्या शोरूमला पोहचेपर्यंत एक पोलीस अधिकारी व दोन पोलीस कर्मचारीयांच्यासह सुरक्षा दिली. वाहनात २७ किलो हे वजन दागिने पॅक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या डब्यांसहित एकत्रित पार्सलचे वजन होते. प्रत्यक्षात सोने किलो, चांदी किलो व डायमंड अलंकार ११०.८७० असे सर्व मौल्यवान वस्तूचे एकूण वजन किलो असे होते, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
“जहाँ विश्वास ही परंपरा है” या ब्रीदवाक्याच्या अनुषंगानेच स्व.रतनलाल सी. बाफनाजींनी घालून दिलेल्या आदर्शावर गेल्या ५० वर्षांपासून रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सची वाटचाल सुरू आहे, पण काही वेळा गैरसमजुतीतून लोक शंका घेऊ शकतात, त्यासाठीच आजच्या पत्रकार परिषदेचे हे आयोजन करण्यात आले आहे.उद्या जनतेसमोर सत्य नक्की पोहचेल असा आमचा विश्वास असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रसंगी आर.सी.बाफना ज्वेलर्सचे जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील उपस्थित होते.