आर्मी अधिकाऱ्याचा जीव टांगणीला, एलसीबीने अडीच तासात आणला जीवात जीव!
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आर्मी अधिकाऱ्याचा जीव टांगणीला लागल्याचा प्रकार जळगावात घडला. अडीच दिवस प्रयत्न करून देखील निराशा हाती आल्याने अखेर त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचे दालन गाठत आपली कैफियत मांडली. पोलीस अधिक्षकांनी घडलेला प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या दरबारी पाठवला आणि अवघ्या अडीच तासात फळ मिळाले. मिशन फत्ते झाल्याच्या आनंदात आर्मीच्या पथकाने पोलीस अधिक्षकांचे आभार तर मानलेच शिवाय संपूर्ण एलसीबी टीमला मिठाई खाऊ घालत आनंद साजरा केला.
भारतासाठी जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या भारतीय सैन्य दलातील अधिकारी आपल्या टीमसोबत आर्मी रेल्वेने राजस्थानहून पुणे आर्मी कॅम्प इथे जात होते. दि.२१ रोजी रेल्वे काही काळासाठी जळगाव येथे थांबली असताना दरम्यानच्या काळात एका चोरट्याने संधी साधत सुभेदार मेजर साहेबांची बॅग लंपास केली. चाळीसगावच्या पुढे गेल्यावर आपली बॅग लंपास झाल्याचे लक्षात घेताच सर्व टीम खळबळून जागे झाली. संशयीत चोरट्याचा शोध घेण्यासाठी आर्मी जवानांनी संपूर्ण रेल्वे शोधली. मात्र थांगपत्ता लागला नाही. जळगावात स्वच्छतागृहाचा उपयोग करण्यासाठी गेले असताना चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुभेदार आणि चार कर्मचारी तात्काळ जळगावला पोहचले. रेल्वे स्थानकावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात पथकाने दिवस घालवल्यावर एक युवक बॅग घेऊन जाताना कैद झाला.
..तर रखडली असती पदोन्नती
पदोन्नतीचे कागदपत्रे, ओळखपत्र महत्त्वाचे
आर्मीचे सुभेदार मेजर म्हणजे पोलीस दलातील पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी. बॅग चोरी झालेल्या सुभेदार साहेबांच्या मार्गदर्शनात ८०० जवानांची बटालियन कार्यरत आहे. काही दिवसात त्या सुभेदारांची पदोन्नती होणार होती आणि त्या संदर्भातील सर्व महत्त्वाचे दस्तऐवज बॅगमध्ये होते. बॅगेत रोकड देखील होती मात्र त्यापेक्षा कागदपत्रे आणि ओळखपत्र महत्त्वाचे होते. पुणे कॅम्प येथे पदोन्नती संदर्भात त्यांना ते कागदपत्रे जमा करावयाची होती. जर कागदपत्रे मिळाले नसते तर त्यांची ३० वर्षांची सेवा मातीमोल होऊन त्यांची पदोन्नती रखडणार होती.
पोलीस अधिक्षकांमुळे लागली लाईन..
आर्मीच्या पथकाने चोरट्यांचा सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे जळगाव बसस्थानकापर्यंत अंदाज घेतला. भजे गल्लीत दोघे शिरल्याचे देखील कॅमेऱ्यात कैद झाले होते. पथकाने पोलीस प्रशासनाच्या नेत्रम विभागाची मदत घेतली मात्र पुढे काही शोध लागत नव्हता, त्यातच त्यांची भाषा हिंदी असल्याने काही शब्दांचा घोळ होत होता. दोन दिवस शोध घेऊन देखील आरोपी हाती लागत नसल्याने अखेर पथकाने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचे दालन गाठले. घडलेला सर्व प्रकार त्यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस अधिक्षकांना तात्काळ याबाबत तपासाच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना दिल्या. आर्मीचे पथक एलसीबी कार्यालयात पोहचले.
भजे गल्लीत गवसला तपासाचा धागा..
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी लागलीच पथकाला सूचना देत रवाना केले. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील काही कॅमेरे तपासले आणि माहिती घेतली असता दोघे भजे गल्लीत दारू प्यायले आणि तेव्हा आम्ही कुक असल्याचे कुणाला तरी सांगत होते. पोलिसांना पहिला धागा तेव्हा गवसला. बसस्थानकाजवळून दोघे एका रिक्षाने स्वातंत्र्य चौकाकडे जाताना कैद झाले. पुढे पोलिसांनी तिन्ही बाजूचे रस्ते तपासले. एका हॉटेलमध्ये चौकशी केल्यावर पोलिसांना दुसरा धागा गवसला. संशयिताच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक मिळाला आणि पक्की माहिती मिळाली. बॅग चोरी करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी गाठले आणि पोलिसी खाक्या दाखवला.
नामांकित हॉटेलचा कूक निघाला चोर
एलसीबीच्या पथकासोबत आर्मी अधिकारी आणि टीम देखील होती. बॅगेत कागदपत्रे सुरक्षीत असल्याचे पाहून सुभेदारांच्या डोळ्यात अश्रू तरळले. बिहार येथे जाण्यासाठी उभे असताना संधी साधत एका वेटरने बॅग लंपास केली होती. बॅगेतील पैसे काढून घेत त्याने बॅग सागरपार्क जवळ नामांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कूक मित्राकडे दिली होती. दोघांनी रोकड खर्च करून मद्यपान केले आणि बॅग खोलीत लपवून ठेवली. बॅगेतील पैसे घेऊन चोरट्याने पुन्हा बिहार गाठले. बॅग घेऊन पथक पोलीस अधीक्षक कार्यालयात परतल्यावर त्यांच्या आनंदाला पारा उरला नव्हता. हसावे की रडावे असे सुभेदारांचे भाव होते.
तीन दिवसांनी घेतले जेवण, वाटली मिठाई
आर्मी सुभेदार आणि पथकाने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्यासह संपूर्ण टीमचे आभार मानले. इतकंच नव्हे तर मोठ्याप्रमाणात मिठाई आणून संपूर्ण कार्यालयात वाटप केली. तीन दिवसानंतर आनंदाचे क्षण कैद करून टीम रात्री जेवणाचा आस्वाद घेत पुण्याच्या दिशेने रवाना झाली.