भडगाव येथे जैन समाजावरील अन्यायाविरोधात निषेध; तहसीलदार व पोलिसांना निवेदन

भडगाव येथे जैन समाजावरील अन्यायाविरोधात निषेध; तहसीलदार व पोलिसांना निवेदन
भडगाव प्रतिनिधि ;- भडगाव प्रतिनिधी विलेपार्ले (मुंबई) येथे दि. १६ एप्रिल २०२५ रोजी जैन मंदिरावर करण्यात आलेल्या बेकायदेशीर कारवाईचा आणि जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे जैन पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सकल जैन समाजातर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर भडगाव तहसीलदार व पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
मुंबईतील विलेपार्ले येथे बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका)ने जैन मंदिरावर बुलडोझर व जेसीबीच्या सहाय्याने अत्यंत क्रूरपणे कारवाई केली. मंदिरातील धार्मिक ग्रंथ, पूजा साहित्याची विटंबना करण्यात आली तसेच प्रतिष्ठित मूर्तींचे विघटन करण्यात आले. या घटनेमुळे जैन समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबन व कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
उध्वस्त केलेल्या मंदिराचे त्या जागेवरच पुनर्निर्माण करण्यात यावे. देशभरातील सर्व जैन तीर्थक्षेत्र, मंदिर, स्थानक, उपाश्रय व साधू-साध्वी निवासस्थानांना कायमस्वरूपी संरक्षण मिळावे यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा. संल विहार (पदभ्रमण) करत असताना राज्य सरकारतर्फे त्यांना सुरक्षा पुरवावी.पालिताना, गिरनार, शिखरजी, राजगृही, राणकपूर अशा तीर्थस्थळांवर जैन धर्मीयांना पूजा-अर्चनेपासून रोखणाऱ्यांवर केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी. गेल्या काही वर्षांतील साधू-संतांवर झालेल्या हल्ल्यांची चौकशी करून हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी.जैन साधू-संतांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र कायदा तयार करावा.पहलगाम येथे जैन पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध.
जैन समाज हा अल्पसंख्यांक असून, अहिंसावादी आणि शांतताप्रिय असूनही काही राजकीय नेते आणि प्रतिनिधी वेळोवेळी समाजविरोधी आक्षेपार्ह वक्तव्य करतात. अशा वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या प्रसंगी संघपती मदनलालजी लुणावत, अध्यक्ष आनंदकुमार चोरडिया, उपाध्यक्ष प्रकाशचंद भंडारी, अभयकुमारजी भंडारी, सुभाषचंद राका, समीर जैन, पुनम छाजेड, नवयुवक अध्यक्ष प्रिंतम भंडारी, उपाध्यक्ष दर्शन जैन, सचिव शुभम सुराणा यांच्यासह जैन समाजाचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.