सजवलेली सायकल, मेघाफोनसह छत्रीमॅन मधुकर ठाकूर….जळगाव जिल्ह्याचे मतदान ‘जनजागृतीचे आयकॉन’
जळगांव :-गेल्या चार निवडणुकापासून एक व्यक्ती निवडणूक लागताच न सांगता मतदान जनजागृतीच्या विविध घोषवाक्यासह रंगवलेली छत्री, सायकलवर जागोजागी लावलेल्या घोषवाक्याच्या पाट्या , मतदान जनजागृतीच्या घोषवाक्याचा बॅनरसाठी वापर केलेला विनियलचा ड्रेस अंगावर चढवून, हातात मेगाफोन घेवून सकाळी 6 वाजता जनजागृतीसाठी बाहेर पडतात… कोणाकडून मोबदला न घेता… कार्यालयीन वेळेपर्यंत जवळपासचं कोणतं तरी गाव घेतात आणि मेगाफोन वरून जागृती करतात … या व्यक्तीचं नाव आहे… मधुकर जुलाल ठाकूर, एरंडोल तालुक्यातील कासोदा गावचे, गावच्या ग्रामपंचायतीत ते मानधनावर नोकरी करतात… कार्यालयीन वेळेत ऑफिस मध्ये हजर राहून कार्यालय संपताच पुन्हा संध्याकाळी उशीर पर्यंत जनजागृती हा यांचा नित्यक्रम….
एवढेच नव्हे तर निवडणूक नसतानाही ते जळगाव जिल्ह्यातील विविध भागात वेगवेगळ्या शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करतात….!!
सध्या ते विधानसभा निवडणूक 2024 या पार्श्वभूमीवर गावागावात जाऊन मतदान जनजागृती विषयी आवाहन करीत आहेत. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाचा घसरणारा टक्का ही चिंतेची बाब असून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा टक्का वाढला पाहिजे यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. आपण होऊन श्री ठाकूर यांच्या सारखे लोकं स्वयंस्फूर्तीने प्रेरित होऊन हे काम करतात हे कौतुकास्पद आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनीही त्यांचा याकामी गौरव केलेला आहे.
सद्या ते एरंडोल तालुक्यातील गावागावात जाऊन मतदान जनजागृती करीत आहेत. मतदान करा, मतदानाचा हक्क बजावा, मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदान करा, लोकशाही बळकट करा, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, अशा प्रकारच्या विविध घोषणांच्या माध्यमातून श्री ठाकूर हे मतदानाबाबत नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याचे काम करीत आहेत. ग्रामीण भागात शेतकरी तसेच मजूर वर्ग हा दिवसभर शेतात कामाच्या ठिकाणी असतो संध्याकाळी शेतातून मजूर घरी आल्यानंतर श्री ठाकूर हे गावागावात फिरून मतदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्याच्या दृष्टीने आवाहन करीत आहेत. श्री ठाकूर यांनी जनजागृतीसाठी लागणारे साहित्य हे स्वखर्चाने विकत घेतलेले आहे. परिसरातल्या खेड्यापाड्यांवर सायकल द्वारे जाऊन ते हे काम करतात. शेती आणि माती ही पार्श्वभूमी असणारे ठाकूर या वयात देखील अंतकरणाने ग्रामीण भागातील जनतेपर्यंत मतदानाचे महत्त्व पोहोचविण्याचे काम करीत आहेत.