दुचाकी चोरीचा उलगडा ;तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त ;एरंडोल बसस्थानकातून चोरटा जेरबंद


दुचाकी चोरीचा उलगडा ;तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त ;एरंडोल बसस्थानकातून चोरटा जेरबंद
जळगाव | प्रतिनिधी : शहरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. बालाजी पेठ येथून चोरीला गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलचा शोध घेत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्या ताब्यातून बजाज कंपनीच्या दोन पल्सर आणि होंडा कंपनीची एक युनिकॉर्न अशा तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीची मोटारसायकल चोरीला
दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव शहरातील बालाजी पेठ परिसरातून बजाज पल्सर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली होती. मोटारसायकलचे मालक निलेश प्रकाश बोरसे (वय २७, रा. बालाजी पेठ, जळगाव) हे बाहेरगावी गेले होते. दि. १८ ऑगस्ट रोजी घरी परतल्यानंतर त्यांची मोटारसायकल जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यानंतर त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक १७९/२०२६, बीएनएस कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा माग काढला
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी डीबी पथकाला मोटारसायकल आणि आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने बालाजी पेठ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.
परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर यांनी सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून संशयिताबाबत माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून शेख इरफान शेख रईस (रा. एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव) याला एरंडोल बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले.
तीन मोटारसायकली जप्त
संशयिताची चौकशी केल्यानंतर चोरीची मोटारसायकल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली. पुढील तपासात त्याच्या ताब्यातून बजाज कंपनीच्या दोन पल्सर आणि होंडा कंपनीची एक युनिकॉर्न, अशा एकूण तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, योगेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल पराग दुसाने, अमोल वंजारी, निलेश घुगे, गणेश ढाकणे, योगेश साबळे तसेच सीसीटीव्ही फुटेज विश्लेषक पोलीस कॉन्स्टेबल मुबारक देशमुख यांनी सहभाग घेतला.
गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ विजय खैरे करीत आहेत.







