शहर पोलीस ठाण्यातील दामिनी पथक लागले कामाला, टवाळखोरांची खैर नाही..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे एका शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले होते. आ.चंद्रकांत पाटील यांनी याविषयी अधिवेशनात देखील मुद्दा उपस्थित केला होता. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जळगाव शहर पोलीस ठाण्यातील दामिनी पथक कामाला लागले असून दररोज ७ शाळा, १ महाविद्यालयाजवळ टवाळखोरांवर लक्ष ठेवण्याचे काम सुरू आहे.
शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून दररोज कुठे ना कुठे छेडखानीचे प्रकार घडत असतात. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील एका शाळेत देखील विद्यार्थिनीचे तोंड दाबून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. आ.चंद्रकांत पाटील यांनी याविषयी अधिवेशनात देखील मुद्दा उपस्थित केला होता. विद्यार्थ्यांच्या रक्षणार्थ आणि टवाळखोरांना लगाम घालण्यासाठी दामिनी पथक तयार करण्यात आले आहे.
दामिनी पथक केले सुरू
जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी आपल्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पाऊल उचलले आहे. पोलीस ठाण्यातील २ महिला आणि २ पुरुष यांचे दामिनी पथक नेमले आहे. दररोज शाळा भरण्याच्या वेळी आणि शाळा सुटताना हे पथक हद्दीतील ६ शाळा आणि १ महाविद्यालय परिसरात गस्त घालतात.
टवाळखोरांवर कारवाई होणार
शाळा, महाविद्यालय परिसरात पथक गस्त घालत असते. ई बीट प्रणालीत त्याची नोंद केली जात असल्याने गस्त १०० टक्के होते. दामिनी पथकातील महिला कर्मचारी पोलीस दीदी म्हणून विद्यार्थिनींशी संवाद साधून पोलिसांप्रती भीती कमी करण्याचा प्रयत्न करतात. तसेच टवाळखोरांचा शोध घेऊन त्यांना लगाम घालण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी दिली आहे.






