Social

नगरसेवकांचा फोन, अतिक्रमण विभाग ऑन ड्युटी; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील शनिपेठ परिसरात भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची अखेर दखल घेण्यात आली. नागरिकांनी सोशल मीडियावर आवाज उठवल्यानंतर स्थानिक नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी तत्काळ पुढाकार घेत मनपा प्रशासनाशी थेट संपर्क साधला. तक्रारीची दखल घेत शनिवारीच अतिक्रमण विभागाने कारवाई करत शनिपेठेतील दोन्ही गल्ल्यांमधील अतिक्रमण हटवले.

जळगाव शहरातील शनिपेठ परिसरात बळीराम मंदिर आणि शनिमंदिर समोरील गल्लीत दररोज भाजीपाला विक्रेते रस्त्यावर लोटगाडी लावून किंवा रस्त्यावर बसून भाजीपाला विक्री करतात. भाजीपाला विक्रेत्यांमुळे जवळपास ७० टक्के रस्ता ब्लॉक होतो आणि वाहनचालकांना ये-जा करण्यास रस्ता राहत नाही. शनिवारी तर कहरच असतो, काही मुजोर विक्रेते अरेरावी देखील करतात. याबाबत आज नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला होता.

तक्रारीची दखल घेत नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांच्याशी संपर्क साधून स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “नवीन तयार केलेले रस्ते जर नागरिकांना वापरण्यास मिळत नसतील, तर अशा रस्त्यांचा उपयोग काय?” असा थेट सवाल त्यांनी केला. तसेच अतिक्रमणमुळे नागरिकांना त्रास होता कामा नये असेही त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, यापूर्वी “शनिवार असल्याने सुट्टी आहे” असे कारण देणारा अतिक्रमण विभाग नगरसेवकांच्या फोननंतर तत्काळ कामाला लागला. शनिवारीच दुपारी अतिक्रमण विभागाचे पथक गल्लीत पोहचले. पथकाने धडक कारवाई करत शनिपेठेतील दोन्ही गल्ल्या मोकळ्या केल्या. या कारवाईत ५ हातगाड्या जप्त करण्यात आल्या.

अनेक दिवसांपासून अतिक्रमणामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी गल्ल्या मोकळ्या झाल्याने समाधान व्यक्त केले. रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याची भावना व्यक्त करत नागरिकांनी नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्यासह अतिक्रमण विभागाचे आभार मानले. नागरिकांच्या तक्रारी, सोशल मीडियावरील आवाज आणि लोकप्रतिनिधींच्या तत्परतेमुळे प्रशासन हालचालीत येऊ शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button