
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव तालुक्यातील देवगाव शिवारात आज दुपारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका ६० वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. इंदुबाई वसंत पाटील असे मृत महिलेचे नाव असून, शेतात काम करत असताना त्यांच्यावर अचानक हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
घटनेची माहिती अशी की, दुपारी १२:३० च्या सुमारास इंदुबाई पाटील या आपल्या शेतात गट नं ५५ मध्ये काम करत होत्या. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा केल्या. जवळच काम करणाऱ्या इतर मजुरांनी हा प्रकार पाहताच त्यांनी तात्काळ पोलीस पाटील रमेश पाटील यांना कळवले.
माहिती मिळताच पोलीस पाटील आणि त्यांचा चुलत भाऊ चंद्रकांत पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी इंदुबाईंना तातडीने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जळगाव तालुका पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर वाढला असून, यामुळे गावकरी आधीच दहशतीत होते. या घटनेनंतर गावकऱ्यांनी वनविभागाला याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे देवगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :