खळबळजनक : जिल्हा रुग्णालयात तिसऱ्यांदा डॉक्टरला मारहाण, कानाचा पडदा फाटला

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) मध्ये कर्तव्यावर असलेल्या एका कनिष्ठ निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी शुक्रवारी रात्री बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात डॉक्टरांच्या कानाचा पडदा फाटल्याने त्यांना काही आठवड्यांचा विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ.मोहित दीपक गादिया (वय २६) असे जखमी डॉक्टरचे नाव असून ते कनिष्ठ निवासी म्हणून सेवा देत आहेत. शुक्रवार ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास भादली येथून फटाका फुटल्यामुळे किरकोळ जखमी झालेले चार महिला व पुरुष उपचारासाठी रुग्णालयात आले होते. उपचारादरम्यान, रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्यामुळे डॉ. गादिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना गर्दी न करण्याबद्दल व बाहेर जाण्याबद्दल विनंती केली.
विनंतीचा राग आल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉ. मोहित गादिया यांच्या कानशिलात लगावली आणि त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतर सहकारी डॉक्टरांनी धाव घेऊन डॉ. गादिया यांना नातेवाईकांच्या तावडीतून सोडवले. दरम्यान, रुग्णालयात जमाव जमत असल्याचे पाहून संबंधित नातेवाईक रुग्णाला घेऊन खासगी दवाखान्यात निघून गेले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. प्राथमिक तपासणीत, कानशिलात बसल्यामुळे डॉ. गादिया यांचा कानाचा पडदा फाटल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
वाढत्या हल्ल्यांमुळे डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपत्कालीन विभागाजवळच पोलीस चौकी उभारलेली असतानाही या चौकीत कायमस्वरूपी पोलीस उपस्थित नसल्याने अशा प्रकारचे हल्ले वारंवार होत असल्याची माहिती निवासी डॉक्टरांनी दिली आहे. यापूर्वीही शल्यचिकित्सा विभागातील डॉ.जैद पठाण आणि डॉ.अभिनय यांना मारहाण झाली होती. आता पुन्हा तिसऱ्या डॉक्टरवर झालेल्या हल्ल्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
निवासी डॉक्टरांच्या मार्ड (MARD) संघटनेचे निवेदन
या घटनेनंतर निवासी डॉक्टरांच्या मार्ड (MARD) संघटनेने उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांना कायमस्वरूपी सुरक्षा पुरवण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांची धाव
घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे एपीआय संतोष चव्हाण व सहकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी डॉक्टरांशी चर्चा करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्याचे काम सुरू होते.






