ब्रेकिंग : अबरारचा हस्तक गुजरात पोलिसांच्या जाळ्यात, २० लाखांचे ड्रग्स जप्त
महाराष्ट्र ते सुरत एमडी ड्रग्जची तस्करी : ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । सुरत शहर गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत, महाराष्ट्रातील जळगावहून सुरतमध्ये एमडी ड्रग्जची डिलिव्हरी करणाऱ्या एका ड्रग तस्कराला अटक केली आहे. हा तस्कर ट्रेनने येऊन उमरावाडा येथील सलीम नगर झोपडपट्टीत ड्रग्जची डिलिव्हरी करणार होता.
स्थानिक वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सुरत गुन्हे शाखेने चिमनी टेकडा येथील सलीम नगर झोपडपट्टीतील घर क्रमांक १४ च्या पहिल्या मजल्यावर छापा टाकून संशयीत आरोपी ट्रक चालक एजाज उर्फ छोटिया उस्मान शेख याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, तो हे ड्रग्ज त्याचा नातेवाईक अबूझर उर्फ हाजी उर्फ जिलानी मुख्तार शेख याच्याकडून घेऊन आला होता. तो आपल्या पत्नीसोबत जळगावहून ट्रेनने सुरत येथे ड्रग्जची डिलिव्हरी देण्यासाठी आला होता.
९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांनी संशयीत आरोपीकडून १९.८७ लाख रुपये किमतीचे १९८.७६० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. यासोबतच एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण २० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ड्रग्ज पाठवणारे आणि मागवणारे दोघेही अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
सुरत शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस.एन.परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नो ड्रग्ज इन सुरत सिटी’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. संशयीत आरोपी एजाज हा जळगावचा रहिवासी असून, तो एमडी ड्रग्जची डिलिव्हरी करण्यासाठी आला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला उमरावाडा, सलाबतपुरा येथून ताब्यात घेतले.
पोलिसांकडून सखोल तपास
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, ड्रग्जच्या या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करत आहेत.






