जुन्या घराच्या खरेदीत १ कोटी १५ लाखांची फसवणूक; मुख्य संशयिताला अटक

जुन्या घराच्या खरेदीत १ कोटी १५ लाखांची फसवणूक; मुख्य संशयिताला अटक
जळगाव : जुन्या घराच्या खरेदी व्यवहारात १ कोटी १५ लाख रुपये घेऊनही मिळकत हस्तांतरित न केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुनील मधुकर चौधरी (वय ५२, रा. धरणगाव) यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य संशयित मनोज लिलाधर वाणी (रा. जिल्हा परिषद कॉलनी, जळगाव) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सुनील चौधरी हे बांधकाम आणि जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात आहेत. जळगाव महापालिका हद्दीतील एका जुन्या घराच्या खरेदीसाठी त्यांनी सौदापावतीनुसार १ कोटी १५ लाख रुपये दिले. मात्र, मिळकत हस्तांतरित न करता टाळाटाळ करण्यात आली आणि रक्कमही परत मिळाली नाही.
यामुळे चौधरी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या प्रकरणी मनोज वाणी यांच्यासह कल्पना वाणी, शैलेंद्र भिरुड उर्फ तनुजा भिरुड, तिलोत्तमा इंगळे, दीपक इंगळे, संदीप पाटील, राजेंद्र सावदेकर, शेखर भिरुड, शिरीष भिरुड, नरेंद्रकुमार भिरुड, ज्ञानेश्वर भिरुड आणि गौरव भिरुड पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.