जळगावात तोतया पोलिसांनी प्रौढाची सोन्याची चेन, अंगठी लुटून केला पोबारा

जळगावात तोतया पोलिसांनी प्रौढाची सोन्याची चेन, अंगठी लुटून केला पोबारा
जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी l पोलिसांचा गणवेश परिधान करून दुचाकीवरून आलेल्या दोन तोतया पोलिसांनी एका ५९ वर्षीय व्यक्तीला फसवून त्यांची सोन्याची चेन आणि अंगठी लंपास केल्याची धक्कादायक घटना २७ मे २०२५ रोजी बजरंग बोगदा परिसरातील पेट्रोल पंपाजवळ घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पिंप्राळा येथील सोमाणी गल्लीत राहणारे संजय भगीरथ सोमाणी हे दुचाकीवरून घरी जात असताना पोलिसांचा गणवेश घातलेल्या दोन दुचाकीस्वारांनी त्यांना अडवले. त्यांनी सोमाणी यांच्याकडे वाहन परवाना मागितला. परवाना दाखविल्यानंतर एका इसमाने उत्तर प्रदेश आणि पंजाबमधून काही संशयित व्यक्ती आल्याचे सांगत, सोमाणी यांना त्यांची सोन्याची चेन आणि अंगठी रुमालात ठेवण्यास सांगितले. सोमाणी यांनी विश्वासाने दागिने रुमालात गुंडाळून खिशात ठेवले आणि पुढे निघाले.
मात्र, काही वेळानंतर रुमाल तपासला असता, त्यात दागिन्यांऐवजी दोन दगड आढळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोमाणी यांनी तात्काळ जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठले आणि दोन अज्ञात तोतया पोलिसांविरुद्ध तक्रार नोंदवली.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अशा प्रकारच्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.